पाटण तहसील कार्यालयासमोर खेकडा वाटप आंदोलन 

पाटण – पाटण तालुक्‍यातील सर्वच धरणग्रस्तांचे वर्षानुवर्षे रखडलेले प्रश्न तात्काळ मार्गी लावावे, अशी मागणी करत सातारा जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष व पाटण कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती विक्रमबाबा पाटणकर यांनी सोमवारी तहसीलदार कार्यालयासमोर शेतकऱ्यांना खेकडा वाटप आंदोलन केले.

यावेळी बोलताना विक्रमबाबा पाटणकर म्हणाले की, सर्वाधिक धरणे पाटण तालुक्‍यात झाली. मात्र गेल्या अनेक वर्षांपासून तालुक्‍यातील धरणग्रस्त, प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न प्रलंबित आहेत. त्यांना न्याय हक्कासाठी आंदोलने करावी लागत आहेत. निष्क्रिय प्रशासक आणि प्रकल्पग्रस्तांचे बाबतीत असलेला अनादर यामुळे महाराष्ट्रात सर्वाधिक धरणे व पाणी असलेला

पाटण तालुका आणि प्रकल्पग्रस्त कुटुंब अक्षरश: उद्‌ध्वस्त झालेले आहेत.
खेकडा प्रवृत्तीच्या शासनाच्या अधिकाऱ्यांमुळे पाटण तालुक्‍यातील धरणग्रस्त-प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न वर्षानुवर्षे रखडलेले आहेत. त्यांचे जीणे मुश्‍किल झाले आहे. यामुळे आम्ही संबंधित धरणग्रस्त शेतकऱ्यांना प्रशासनातील अधिकाऱ्यांचा निषेध म्हणून खेकडा वाटप केलेले आहे.

खेकड्यांच्यामुळे धरणे फुटतील व शेतकऱ्यांना त्यांच्या मूळ जमिनी परत मिळतील. व त्यांचा उदरनिर्वाह सुरू होईल. धरणग्रस्तांचे प्रश्न ताबडतोब सुटले पाहिजेत. अन्यथा तालुक्‍यातील सर्व धरणांत धरणग्रस्त शेतकरी हे खेकडे सोडणार असून हा खेकडा शेतकऱ्यांसाठी वरदान ठरेल व प्रशासनाच्या अधिकाऱ्यांचा बंदोबस्त होईल, अशीही संतप्त प्रतिक्रिया पाटणकर यांनी यावेळी व्यक्त केली.

यावेळी विक्रमबाबा पाटणकर यांच्या हस्ते तहसिलदार कार्यालयासमोर धरणग्रस्त शेतकऱ्यांना खेकडा वाटप करण्यात आले. तत्पूर्वी तहसीलदार रामहरी भोसले यांच्याशी आंदोलनांच्या विषयावर चर्चा करण्यात आली. यावेळी प्रा. रविंद्र सोनावले, दादासाहेब कदम, वामनराव साळुंखे यांच्यासह तालुक्‍यातील धरणग्रस्त शेतकरी
मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी झाले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)