कोवॅक्सिनमध्ये गाईच्या वासराचं रक्त ? काँग्रेस नेत्याच्या दाव्यावर केंद्रीय आरोग्यमंत्री म्हणाले…

नवी दिल्ली – भारत बायोटेकच्या करोना प्रतिबंधक कोवॅक्सिन लसीसंदर्भात माहिती अधिकारात मागवलेली माहिती आणि काँग्रेसचे डिजीटल कम्युनिकेशन तथा सोशल मीडिया कोऑर्डिनेटर गौरव पांधी यांनी केलेल्या ट्विटमुळे नवीन वाद निर्माण झाला आहे. यावर भाजपने प्रतिक्रिया दिली आहे.

गौरव पांधी यांनी आरटीआयमधून मिळालेलं उत्तर ट्विट केलं आहे. ज्यात म्हटलं की, गाईच्या नवजात वासरातील सीरमच्या मदतीने कोविड १९ प्रतिबंधक कोवॅक्सिन लस तयार करण्यात येते.  विकास पाटनी यांनी आरटीआयद्वारे मागविलेल्या माहितीत सेंट्रल ड्रग्स स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायजेशनकडून अशा प्रकारची माहिती देण्यात आली आहे.

या ट्विटनंतर काँग्रेस प्रवक्ते पवन खेडा यांनी म्हटलं की, या संपूर्ण प्रकरणात  भारत बायोटेक आणि सरकारने आरटीआयमध्ये मिळालेल्या माहितीवर उत्तर द्यावं.

यावर केंद्रीय आरोग्यमंत्री यांनी ट्विट करून स्पष्टीकरण दिलं आहे. ते म्हणाले की, कोवॅक्सिनच्या अंतिम लस उत्पादनामध्ये नवीन जन्मलेल्या वासराचा सीरम नसतो. सध्या करण्यात येणारे दावे चुकीच्या पद्धतीने सादर करण्यात येत आहेत. प्राण्यांच्या सीरमचा वापर लसी बनविण्याच्या प्रक्रियेत अनेक दशकांपासून केला जात आहे, परंतु शेवटच्या उत्पादनातू तो पूर्णपणे काढून टाकला जातो, असं हर्षवर्धन यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.


दुसरीकडे भाजपचे प्रवक्ते संबित पात्रा यांनी म्हटलं की, लस निर्मितीसंदर्भात काँग्रेस भ्रम पसरवत असून हे महापाप असल्याचं त्यांनी म्हटलं.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.