पुणे – सीरमच्या लसीच्या कोव्हिशिल्ड नावावर हरकत घेत नांदेड येथील क्युटीस बायोटीक या कंपनीने शिवाजीनगर न्यायालयात दाखल केलेल्या दाव्यात दोन्ही पक्षांचा युक्तीवाद पूर्ण झाला. यावर 30 जानेवारी रोजी निकाल होणार आहे. सत्र न्यायाधीश ए. व्ही. रोट्टे यांच्या न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी सुरू आहे.
या दाव्यावर शुक्रवारी दोन्ही पक्षांनी आपली बाजू मांडली. क्युटीस बायोटीकने ट्रेडमार्कचा अर्ज कंपनी असलेल्या ठिकाणी करायला हवा होता. मात्र त्यांनी तो दिल्लीतील रजिस्टरकडे केला आहे. मानवी लस बनविण्यासाठी अनेक परवानग्या आणि प्रयोग तसेच बांधकाम आवश्यक असते. सिरमने त्याची सर्व तयारी केली आहे. मात्र तशी तयारी क्युटीस बायोटीकने केलेली नाही.
वस्तूंच्या खरेदीबाबत न्यायालयात सादर केलेली बिले ही हर्बल उत्पादनांची आहेत. तसेच लशीबाबत सिरमने पहिल्यांदा अर्ज केला असून लशीचे वितरण देखील सुरू झाले आहे, असा युक्तिवाद सिरमच्या वतीने ऍड. एस. के. जैन यांनी केला.