नवी दिल्ली – भारतात दिली जाणारी कोविशिल्ड लस घेतलेल्या प्रवाशांना आता युरोपातील स्वित्झर्लंडसह सात देशांत प्रवासाला परवानगी देण्यात आली आहे. भारताने युरोपियन युनियनला यासंदर्भात इशारा दिल्यानंतर संघातील सात देशांनी हा निर्णय घेतला असल्याचे राजनैतिक सूत्रांच्या हवाल्याने दिल्या गेलेल्या बातमीत म्हटले आहे.
स्वित्झर्लंडने कोविशिल्डला मान्यता दिली आहे. तसेच भारतातील कोणत्याही लसीला आमच्याकडून ग्रीन पास दिला जाणार असल्याचे जर्मनीनेही स्पष्ट केले आहे. युरोपीय युनियनने कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिन या भारतात दिल्या जाणाऱ्या लसींना मान्यता द्यावी, अन्यथा युरोपीय नागरिकांना क्वारंटाइन करण्याचा निर्णय देशात लागू केला जाऊ शकतो, असा स्पष्ट इशारा भारताकडून देण्यात आल्याच्या पार्श्वभूमीवर या देशांनी हे माघारीचे पाऊल उचलले आहे.
युरोपातील 27 देशांनी स्वतंत्रपणे भारतीय लसींना मान्यता देण्याबाबतचा निर्णय घ्यावा व त्या लसींचे डोस घेतलेल्या भारतीयांना ग्रीन पास जारी करावा, असेही भारताकडून सांगण्यात आले होते.
कोविडच्या पार्श्वभूमीवर युरोपातील देश त्यांच्याकडे येणाऱ्या पर्यटक अथवा कामानिमित्त येणाऱ्या नागरिकांसाठी ग्रीन पास जारी करत आहेत. ज्या लोकांना वॅक्सजेवरिया, मॉडर्ना, फायझर आणि जॉन्सन अँड जॉन्सन या चार लसींपैकी एक लस घेतली असेल त्यांनाच हे पास दिले जात होते. त्यामुळे कोव्हॅक्सिन अथवा कोविशिल्ड घेतलेल्या भारतीयांना युरोपात जाण्यास अडचणी येत होत्या. मात्र, भारताच्या इशाऱ्यानंतर आता या लस घेणाऱ्यांनाही आता तेथे ग्रीन पास दिला जाणार आहे.
दरम्यान, युरोपीय युनियनच्या या मनमानी कारभाराची आफ्रिका संघातील 54 देशांनीही खिल्ली उडवली होती. त्याचे या देशांमध्येही सीरमची कोविशिल्ड ही लस देण्यात आली आहे. त्यामुळे त्यांच्या नागरिकांनाही युरोपात प्रवास करण्यास अडचणी येत होत्या.