पुणे – देशभरात सीरम इन्स्टिट्यूटच्या ‘कोविशिल्ड’ या करोना प्रतिबंधक लसींच्या वाहतुकीसाठी पुणे विमानतळाची भूमिका महत्त्वाची ठरत आहे. 12 जानेवारी ते 27 मे दरम्यान विमानतळाहून लसीच्या 10 कोटीहून अधिक मात्रांची देशात आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर वाहतूक करण्यात आली.
करोना प्रतिबंधक लसीसह आवश्यक वैद्यकीय साहित्याचा पुरवठा विनाअडथळा करण्यासाठी देशातील सर्व विमानतळ महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. पुणे विमानतळाचा देखील यात प्रामुख्याने सहभाग आहे. यासह प्रवाशांचा सुरक्षित प्रवास सुनिश्चित करण्यासाठी, केंद्र आणि राज्य सरकारच्या सूचनांनुसार कोविडसंबंधित सर्व मार्गदर्शक सूचना आणि शिष्टाचाराचे पालन विमानतळावर करण्यात येत आहे. याशिवाय अनेक इलेक्ट्रॉनिक आणि कायमस्वरुपी फलकांद्वारे प्रवाशांना विविध सूचना देण्यात येत आहे.
पुणे विमानतळाहून सुमारे 9 हजार 52 नग दिल्ली, कोलकत्ता, चेन्नई, अहमदाबाद, बंगळुरू, भोपाळ, गोवा, जयपूर, पोर्ट ब्लेअर, विजयवाडा, भुवनेश्वर, पटना, लखनौ, चंदीगढ, लेह, करनाल, हैदराबाद, गुवाहाटी, रांची, जम्मू, कोची, श्रीनगर आणि त्रिवेंद्रम आदी ठिकाणी पाठविल्या आहेत. यासह पुणे विमानतळाहून आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील लसींची रवानगी होत आहे.
विमानतळाहून चार्टर्ड विमानाद्वारे फेब्रुवारी 2021 मध्ये कोविड प्रतिबंधक लसीच्या सुमारे 2 लाख 16 हजार मात्रा सुरिनाम, सेंट किट्स, सेंट व्हिन्सेंट आणि ग्रेनाडाइन्स, अँटिग्वा, सेंट लुसिया येथे पाठविल्या आहेत. तर न्यूमोनिया प्रतिबंधक लसीच्या मात्रांचे सुमारे 161 नग कोलकत्यात आणि कोविड चाचणी संच विमानतळाहून दिल्लीला पाठविले आहेत.
भारतीय विमानतळ प्राधिकरण आणि विमानतळाचे अधिकारी, कर्मचारी कोविशिल्ड लसीच्या मात्रांचे विनाअडथळा आणि सुरळीत वितरण करत आहे. भारतीय विमानतळ प्राधिकरण, एएआय कार्गो लॉजिस्टिक ऍन्ड अलाइड सर्व्हिसेस कंपनी लिमिटेड, केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल, सीरम इन्स्टिट्यूट, विमान कंपन्यांसह भारतीय हवाई दलाची पथके पुणे विमानतळाहून लस घेऊन जाणाऱ्या विमानांच्या उड्डाणांचा समन्वय आणि प्राधान्यक्रम सुनिश्चित करत असल्याची माहिती नागरी उड्डाण मंत्रालयाने दिली.