नवी दिल्ली – करोनावरील लसींच्या चढ्या दरांवरून देशात वादंग सुरू असतानाच पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने दिलासादायक पाऊल उचलले आहे. कोविशिल्ड लसीचे उत्पादन करणाऱ्या त्या कंपनीने राज्यांसाठीच्या दरात 100 रूपयांची कपात केली आहे. त्यामुळे राज्य सरकारांना आता कोविशिल्डच्या एका डोससाठी 400 रूपयांऐवजी 300 रूपयेच मोजावे लागतील.
देशातील लसीकरणासाठी सध्या कोविशिल्ड आणि भारत बायोटेक कंपनीची कोव्हॅक्सिन अशा दोन लसींचा वापर होत आहे. त्या कंपन्या केंद्र सरकारला अवघ्या 150 रूपयांत त्यांच्या लसी उपलब्ध करत आहेत. मात्र, राज्य सरकारे आणि खासगी रूग्णालयांसाठी ते दर कितीतरी अधिक असल्याने टीकेची झोड उठली. त्यानंतर केंद्र सरकारने लसींच्या किमती कमी करण्याची सूचना उत्पादकांना केली. त्याला प्रतिसाद देत सीरम इन्स्टिट्यूटने राज्यांसाठीचा दर कमी केला. त्याविषयीची माहिती सीरमचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) अदर पुनावाला यांनी ट्विटरवरून दिली. दरकपातीच्या पाऊलाचा उल्लेख त्यांनी मानवतावादी कृती म्हणून केला. दरकपातीमुळे राज्यांचा हजारों कोटींचा निधी वाचेल. त्यातून लसीकरणाची व्याप्ती वाढून अनेकांचा जीव वाचेल, अशी भावनाही त्यांनी व्यक्त केली. खासगी रूग्णालयांसाठी कोविशिल्डचा दर (600 रूपये) जैसे थे ठेवण्यात आला आहे.
As a philanthropic gesture on behalf of @SerumInstIndia, I hereby reduce the price to the states from Rs.400 to Rs.300 per dose, effective immediately; this will save thousands of crores of state funds going forward. This will enable more vaccinations and save countless lives.
— Adar Poonawalla (@adarpoonawalla) April 28, 2021
सीरमने केलेल्या दरकपातीनंतर आता भारत बायोटेकच्या निर्णयाबाबत उत्सुकता आहे. त्या कंपनीनेही याआधीच कोव्हॅक्सिनचे दर जाहीर केले आहेत. त्यानुसार, कोव्हॅक्सिनचा एक डोस राज्यांना 600 रूपयांना, तर खासगी रूग्णालयांना 1 हजार 200 रूपयांना उपलब्ध होईल. सीरमच्या निर्णयामुळे भारत बायोटेकलाही दरकपात करणे भाग असल्याचे मानले जात आहे.