सातारा – कोव्हिड-19 आजाराची लक्षणे असलेल्या गंभीर रुग्णांच्या घशातील स्रावांच्या चाचण्यांसाठी क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांना आता पुणे किंवा इतर ठिकाणच्या प्रयोगशाळांवर अवलंबून रहावे लागणार नाही.
या प्रकारच्या चाचण्यांसाठी जिल्हा रुग्णालयात ट्रूनॅट’ हे अद्ययावत मशीन बसविण्यात आले असून या मशीनद्वारे चाचण्या करण्यास भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद (इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च म्हणजेच आयसीएमआर) आणि नागपूरच्या अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था (ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस म्हणजेच एम्स) यांनी मान्यता दिली आहे. या मशीनद्वारे एका दिवसाला 35 ते 40 चाचण्या करता येतील, अशी माहिती जिल्हाधिकारी शेखर सिंह व जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.
हे मशिन उपलब्ध करून कार्यान्वित करण्यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय भागवत, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अमोद गडीकर व जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. अविनाश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा क्षयरोग केंद्राच्या डॉ. श्रीमती ए. व्ही. जाधव, नोडल ऑफिसर डॉ. सारिका बडे, डॉ. हिरास आणि प्रयोगशाळा तंत्रज्ञांनी परिश्रम घेतले. ट्रूनॅट’ मशीन क्षयरोग्यांच्या स्रावांचे नमुने तपासण्यासाठी वापरण्यात येते. या मशीनमध्ये औषध प्रतिबंधक क्षयरोगाच्या चाचण्या करण्यात येतात.
आता या मशीनद्वारे कोव्हिड-19 च्या चाचण्या करण्यासही आयसीएमआर’ने मान्यता दिली आहे. सातारा येथील क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा रुग्णालयात हे मशीन बसविण्यात आले आहे. येथे गंभीर लक्षणे आणि अतितातडीचे उपचार आवश्यक असलेल्या रुग्णांच्या चाचण्या करून त्यांचे अहवाल तात्काळ मिळणार आहेत. त्यामुळे या चाचण्यांसाठी जिल्ह्याबाहेरच्या प्रयोगशाळांवरील अवलंबित्व काही प्रमाणात कमी होण्याची शक्यता आहे.