नवी दिल्ली – देशात वाढत्या करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर लसीकरणावर भर देण्यात येत आहे. लसीच्या दोन डोस मध्ये व बूस्टर डोस मधील अंतर कमी करण्यात आले असल्याची माहिती फिरत होती. दरम्यान दुसरा डोस आणि बूस्टर डोस यांच्यातील अंतर सध्यातरी कमी करण्यात आले नसल्याचे केंद्राकडून सांगण्यात आले आहे. वृत्तसंस्था एएनआयने अधिकृत सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार पूर्वीप्रमाणेच, दोन डोसमधील अंतर नऊ महिन्यांपर्यंत समान राहील. सद्यातरी डोस मधील अंतर कमी करण्याचा विचार नाही.
सुरुवातीच्या काही अहवालांमध्ये असा दावा करण्यात आला आहे की नॅशनल टेक्निकल अॅडव्हायझरी ग्रुप (NTAGI) च्या शिफारशीने दुसरा डोस आणि बूस्टर डोसमधील अंतर कमी करणे अपेक्षित होते. ICMR आणि इतर आंतरराष्ट्रीय संशोधन संस्थांच्या अभ्यासकांनी असे सुचवले आहे की दोन्ही डोससह प्राथमिक लसीकरण सहा महिन्यांनंतर अँटीबॉडीची पातळी कमी करते आणि बूस्टर देऊन रोगप्रतिकारक क्षमता वाढवते.