हडपसर : मुंढवा भागाला जोडून असलेला केशवनगर ग्रामपंचायत भाग महापालिकेत समाविष्ट झालेला आहे. येथील लोकसंख्या मोठी आहे. तरीही केशवनगर सारख्या मोठ्या परिसरात लसीकरण केंद्र अद्यापही सुरु झालेले नाही. तेव्हा या भागासाठी स्वतंत्र लसीकरण केंद्र सुरू करावे, अशी मागणी भाजप शहर सरचिटणीस संदीप लोणकर यांनी केली आहे.
केशवनगर येथे लसीकरण केंद्र सुरू करण्यात यावे यासाठी लोणकर यांनी महापौर मुरलीधर मोहोळ यांना निवेदन दिले आहे. सध्या केशवनगर परिसरातील नागरिकांना लसीकरणासाठी मुंढवा येथील महापालिकेच्या कोद्रे हॉस्पिटल येथे जावे लागते. व त्यामुळे नागरिकाची मोठ्या प्रमाणावर गैरसोय होत
आहे. तसेच कोद्रे हॉस्पिटल येथील लसीकरण यंत्रणेवर ताण निर्माण होत आहे.
तरी केशवनगर परिसरातील नागरिकांची मोठी संख्या व लसीकरणाची मागणी पाहता या भागामध्ये लसीकरण केंद्र होणे गरजेचे आहे, असे संदीप लोणकर यांनी या निवेदनात म्हटले असून नागरिकांच्या मागणीनुसार केशवनगर भोई वस्ती येथील (रेणुका माता मंदिर शेजारी) असलेल्या महापालिकेच्या शाळेत हे लसीकरण केंद्र सुरु करावे असेही भाजप सरचिटणीस संदिप लोणकर यांनी महापौर यांना सुचवले आहे.