धर्मादाय कार्यालयात पुन्हा कोविड सुरक्षा प्रतिबंध लागू

पुणे – करोना रूग्णांमध्ये लक्षणीय वाढ होण्याच्या प्रकारानंतर पुण्याचे सह धर्मादाय आयुक्त सुधीरकुमार बुक्के यांनी धर्मादाय कार्यालयात पुन्हा कोविड सुरक्षा प्रतिबंध लागू केले आहेत. त्यानुसार मास्कचा वापर अनिवार्य केला असून सॅनिटायझर वापरून कार्यालयात प्रवेश करण्यास आदेशित केले आहे.

दुसरी लाट दृष्टीक्षेपात असताना संसर्ग रोखण्यास अभ्यागत, वकील व त्यांचे सहाय्यक व पक्षकारांनी कार्यालयात गर्दी न करण्याचे आवाहन केले आहे. तसेच संपर्क व गर्दी टाळण्यासाठी कागदपत्रांची स्वीकृती, हिशोब पत्रके दाखल करणे, सही शिक्क्याच्या नकला प्राप्त करणे यासाठी पुन्हा स्वतंत्र खिडक्यांचे नियोजन करण्यात आले आहे.

याबाबत तेथील पब्लिक ट्रस्ट प्रॅक्टीशनर्स असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. मुकेश परदेशी म्हणाले की, पुणे हे विभागीय कार्यालय असल्याने सोलापूर, सातारा, अहमदनगर व पुणे जिल्ह्यातील वकील व पक्षकार येत असल्याने येथे कायमच गर्दी असते. ती नियंत्रित होणे गरजेचे आहे.

सचिव ॲड. राजेश ठाकूर यांनी वकिलांना आवाहन केले की आपल्या पक्षकारांना आवश्यकता असेल तरच कार्यालयात बोलवावे. पब्लिक ट्रस्ट प्रॅक्टीशनर्स असोसिएशन, पुणेचे विश्वस्त ॲड. शिवराज प्र. कदम जहागिरदार म्हणाले, धर्मादाय विभागाने राज्यभरातील सर्व कार्यालयांमध्ये व्हिडीओ  कॅान्फरन्सिंगची सोय करायला हवी. जेणेकरुन पक्षकारांना कार्यालयात येण्याची आवश्यकता राहणार नाही तसेच दूरस्थ वकिलांना या माध्यमातून त्यांच्या केसेसचे कामकाज तथा युक्तीवाद करता येईल.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.