करोनाच्या दुसऱ्या लाटेचा महाराष्ट्राला मोठा फटका; आरोग्य सचिवांनी सांगितली आकडेवारी

नवी दिल्ली – देशातील करोना रुग्ण संख्येमध्ये पुन्हा एकदा चिंताजनक वाढ होऊ लागली आहे. विषाणूच्या पहिल्या लाटेनंतर देशात नवे रुग्ण आढळून येण्याचा आलेख कमालीचा घसरला होता. मात्र करोनाचा नवा स्ट्रेन व सुरक्षिततेच्या उपायांबाबत नागरिकांमधील वाढती बेजबाबदारी यांमुळे या विषाणूने आता चांगलेच हातपाय पसरले आहेत. पाहिल्या लाटेप्रमाणेच दुसऱ्या लाटेतही ‘महाराष्ट्र’ करोनाचा प्रमुख हॉटस्पॉट ठरलाय. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये सध्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे परिस्थिती हाताबाहेर चालली असल्याचं चित्र असून विषाणूची साखळी तोडण्यासाठी सरकारने पुन्हा एकदा निर्बंध लागू केले आहेत.

अशातच आज केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी महाराष्ट्रातील करोना परिस्थितीबाबत चिंता व्यक्त केली आहे. ते नवी दिल्ली येथे बोलत होते. “देशातील सर्वाधिक करोना रूग्णसंख्या असलेल्या १० जिल्ह्यांपैकी ७ जिल्हे हे एकट्या महाराष्ट्रातील असून उर्वरित तीन जिल्हे कर्नाटक, छत्तीसगड व दिल्ली येथील आहेत.” अशी माहिती भूषण यांनी दिली.

यावेळी बोलताना भूषण यांनी, दिल्ली व छत्तीसगड येथे करोना रुग्णांच्या मृत्यूच्या वाढत्या प्रमाणाबाबत चिंता व्यक्त केली. तसेच, देशातील एकूण सक्रिय बाधितांपैकी ५८ टक्के सक्रिय बाधित महाराष्ट्रात असून देशातील एकूण करोना मृत्यूंपैकी महाराष्ट्रात ३४ टक्के मृत्यूंची नोंद झाल्याचेही त्यांनी सांगितले.

आरटी-पीसीआर चाचण्या वाढावा 

भूषण यांनी, “आम्ही राज्यांना आरटी-पीसीआर चाचण्यांची संख्या वाढवावी असे निर्देश दिले आहेत. महाराष्ट्रात गेल्या काही आठवड्यांपासून या चाचण्यांचे प्रमाण घटले आहे. येथे गत आठवड्यामध्ये एकूण चाचण्यांपैकी केवळ ६० टक्के चाचण्या आरटी-पीसीआर प्रकारच्या करण्यात आल्या आहेत. हे प्रमाण किमान ७० टक्के अथवा अधिक असावे असा आमचा राज्यांना सल्ला असेल.” असं सांगितलं.

छत्तीसगड येथील परिस्थितीबाबत व्यक्त केली चिंता

“छत्तीसगड हे लहान राज्य असताना देखील देशातील एकूण रुग्णसंख्येच्या ६ टक्के रुग्ण या राज्यातील आहेत. तसेच एकूण करोना मृत्यूंपैकी ३ टक्के मृत्यू येथे झाले आहेत. करोनाच्या दुसर्या लाटेचा छत्तीसगडला मोठा फटका बसलाय” अशी माहितीही भूषण यांनी दिली.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.