बीजिंग – बीजिंगमध्ये ओमायक्रॉनचा पहिला रुग्ण सापडला आहे. त्यामुळे चीनमध्ये यापूर्वीच लागू करण्यात आलेले निर्बंध आणखीन कडक करण्यात येणार आहेत. विशेषतः हिवाळी ऑलिम्पिक अगदी तोंडावर आले असताना चीनमध्ये करोनाशी संबंधित निर्बंध आणखीन कडक करावे लागले आहेत.
ओमायक्रॉनची चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर संबंधित रुग्ण ज्या ज्या ठिकाणी गेला होता, त्या ठिकाणच्या तब्बल 13 हजार नागरिकांच्या तपासण्या करण्यात आल्या आहेत, असे सरकारी माध्यमांनी म्हटले आहे. हा रुग्ण रहात असलेली अपार्टमेंट आणि त्याच्या कामाची इमारत पूर्णपणे सील करण्यात आली आहे. हा व्यक्ती बीजिंगच्या वायव्येकडील हैदान भागातील रहिवासी आहे. तो अलिकडील दोन आठवड्यांच्या काळात बीजिंग शहराबाहेर गेला नव्हता. त्यामुळे बीजिंग शहराबाहेर संसर्ग पसरला नसण्याची शक्यता गृहित धरली जात आहे.
बीजिंग शहरात ओमायक्रॉनचा शिरकाव झाल्यामुळे आता संपूर्ण बीजिंग शहरावर कठोर निर्बंध लागू करण्याचा विचार प्रसासनाकडून केला जाऊ लागला आहे. तियान्जिन शहराशी असलेली वाहतूक यापूर्वीच पूर्णपणे थांबवण्यात आली आहे. आंतरराष्ट्रीय विमान वाहतूक देखील लक्षणीयरित्या कमी करण्यात आली आहे. शाळा आणि महाविद्यालये बंद करण्यात आली आहेत आणि ऑनलाइन शिक्षण देणे सुरू केले गेले आहे.
हिवाळी ऑलिम्पिक स्पर्धा 4 फेब्रुवारीपासून सुरू होणार आहेत. चांद्र नववर्षाच्या आनंदोवात्सवानंतर लगेचच या स्पर्धा होणार आहेत. या स्पर्धांसाठी कोणाही प्रेक्षकांना प्रवेश दिला जाणार नाही.