पुण्यात विप्रोच्या सहाय्याने देशातील पहिले “पीपीपी मॉडेल’
पुणे – करोना विषाणूच्या महामारीत ग्रामीण भागातील बाधितांना तत्काळ उपचार मिळण्यासाठी पुणे जिल्हा परिषदेने विप्रो आणि राज्य शासनाच्या मदतीने सुसज्ज समर्पित कोविड आरोग्य केंद्र उभारले आहे. पीपीपी मॉडेल मधून हे केंद्र सुरू करण्याचा देशात पहिला मान जिल्हा परिषदेने मिळविला असून अवघ्या एक महिन्यात तब्बल 504 रुग्ण क्षमतेचे केंद्र उभारण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हा परिषद अध्यक्षा निर्मला पानसरे यांनी दिली.
जिल्हा परिषदेने ग्रामीण भागात 27 ठिकाणी तपासणी केंद्रे व 60 ठिकाणी उपचार सुविधा उभ्या केल्या आहेत. कोरोना संक्रमण रोखण्यात जिल्हा परिषद प्रशासन नक्कीच यशस्वी होईल, असा विश्वास निर्मला पानसरे यांनी केंद्राच्या उद्घाटनप्रसंगी व्यक्त केला.
विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर म्हणाले की, करोनाचे संकट पाहता पुणे जिल्हा परिषद, जिल्हा आरोग्य सोसायटी, राष्ट्रीय आरोग्य अभियान व विप्रो कंपनी यांच्या संयुक्त विद्यमाने हे सुसज्ज रुग्णालय उभारण्यात आले.
टीव्हीसह कॅरम बोर्ड आणि आहारही…
विप्रो कंपनीकडून रुग्णाच्या मनोरंजनासाठी प्रत्येक वार्डमध्ये एक टीव्ही, कॅरम बोर्ड, बुद्धिबळ, मासिके व वर्तमानपत्रांची व्यवस्था करण्यात येणार आहे. सर्व रुग्णांना आहार देण्यात येणार असून, बेडची सुविधा देणार आहे. जिल्हा आरोग्य सोसायटीकडून रुग्णालयाचे व्यवस्थापन वैद्यकीय अधीक्षक हे पाहतील. रुग्णालयातील मनुष्यबळ व साधनसामग्रीची तरतूद एनएचएम मार्फत करण्यात येणार आहे.