आमदार लांडगे यांच्या पुढाकाराने महाराष्ट्रातील पहिला प्रयोग
पिंपरी – करोनाला नियंत्रणात आणण्यासाठी आता प्रभागनिहाय लोकसहभागातून कोविड सेंटर उभारण्यात येणार आहे. भाजपा शहराध्यक्ष व आमदार महेश लांडगे आणि महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्यामध्ये महत्त्वपूर्ण बैठक झाली. त्यानंतर प्रशासन आणि लोकप्रतिनिधींच्या एकत्रित सहकार्याने महाराष्ट्रातील पहिलाच असा प्रयोग शहरात राबविण्यात येणार आहे. त्याची सुरूवात भोसरी विधानसभा मतदार संघातून होईल.
शहरात आता कोविड रुग्णांसाठी बेड कमी पडू लागले आहेत. तसेच, करोना सेंटरमध्ये काम करणारे कर्मचारी, डॉक्टर यांच्यावरही मोठा ताण आहे. यावर उपाययोजना करण्यासाठी निर्णय घेण्यात आला.
शहरात एकूण 32 प्रभाग आहेत. प्रत्येक प्रभागात 100 बेडचे कोविड सेंटर उभारण्यात येईल. रुग्णांना घरापासून जवळ अंतरावर उपचार किंवा क्वॉरंटाईन सुविधा उपलब्ध होईल.
कोविड सेंटरमध्ये आवश्यकता असेल, तर रुग्णांच्या कुटुंबियांना घरातून जेवण उपलब्ध करुन देता येईल. अशाप्रकारे भोसरी मतदार संघातील 12 प्रभागात एकूण 1 हजार 200 बेडची सुविधा उपलब्ध होईल. प्रशासन खासगी डॉक्टरांना कोविड केअर सेंटरमध्ये काम करण्यासाठी मदतीला घेत आहे. मात्र, डॉक्टरांच्या मानधनावरुन नाराजीचा सूर असल्याने डॉक्टर आणि प्रशासनात समझोता होत नाही. उलट, प्रभागनिहाय कोविड सेंटरमध्ये एक दिवस मोफत रुग्णसेवा करण्याची तयारी डॉक्टर संघटनांनी दर्शवली आहे. 20-30 हजार लोकसंख्या असलेल्या प्रभागात 30 खासगी डॉक्टर नक्कीच असणार, म्हणजे तीसही दिवस मोफत डॉक्टर उपलब्ध होतील.
पीपीपी पद्धतीने रुग्णसेवाही होऊ शकते!
प्रशासन आणि लोकप्रतिनिधी आजवर पब्लिक प्राइव्हेट पार्टनरशीप तत्त्वावर विकासकामे करताना दिसतात. पण, पीपीपी तत्त्वावर रुग्णसेवा करुण्याचा प्रयत्न महाराष्ट्रात पहिल्यांदा पिंपरी-चिंचवडमध्ये होणार आहे. लोकांचा म्हणजे लोकप्रतिनीधी, नगरसेवक, स्वयंसेवक आणि प्रशासन यांनी एकत्रित काम केल्यास महापालिका खर्च कमी होणार आहे. विशेष म्हणजे, त्या-त्या प्रभागातील खासगी डॉक्टर सामाजिक बांधिलकी म्हणून एक दिवस मोफत सेवा देण्यास तयार आहेत.