संशयित १२ जणांचे तपासणी अहवाल निगेटिव्ह; कोरोनाची साखळी तुटली
वेल्हे(प्रतिनिधी) – वेल्हे तालुक्यात मागील दोन महिन्यांपासून कोरोनाने धुमाकूळ घातला असून बाधित रुग्णांच्या संपर्कातील संशयितांच्या स्वॅबची तपासणी करण्यासाठी पुण्याला जावे लागत होते. या पार्श्वभूमीवर भोरचे उपविभागीय अधिकारी राजेंद्रकुमार जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली वेल्ह्याचे तहसीलदार शिवाजीराव शिंदे यांनी वेल्हे येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत कोविड सेंटरची उभारणी केली असून नमुना घेण्यासाठी यंत्रणा सज्ज झाली आहे.
वेल्हे तालुक्यात कोरोना संसर्ग सुरूच आहे. जुने रूग्ण बरे होवून घरी परतत असले तरी दिवसेंदिवस नव्या रूग्णांची भर पडत आहे. या रूग्णांच्या संपर्कात येणाऱ्या संशयित रूग्णांना तपासणीसाठी पुण्यातील रूग्णालयात घेऊन जावे लागत होते. रूग्णांना घेऊन जाण्यासाठी रुग्णवाहिका लवकर मिळत नव्हती. पर्यायाने कोरोनाची साखळी रोखण्यासाठी विलंब होत होता. यासाठी प्रशासनाला खूप धावपळ करावी लागत होती. त्यामुळे या धावपळीत प्रशासनाचे व संशयीत रुग्णांचे अतोनात हाल होत होते. हा सर्व त्रास थांबावा या उद्देशाने वेल्ह्याचे तहसीलदार शिवाजीराव शिंदे यांनी वेल्हे येथील औद्योगिक प्रशिक्षण केंद्रात कोविड सेंटरची उभारणी केली असून सर्व तांत्रिक अडचणी दूर झाल्याने हे केंद्र खुले करण्यात आले आहे. या उभारलेल्या कोविड सेंटर मध्ये मंगळवारपासून कोरोना रूग्णांच्या स्वॅबचे नमुने घेण्यास सुरूवात करण्यात आले आहे.
सध्या वेल्हे तालुक्यात साखर येथील ६८ वर्षीय महिला व निगडे मोसे येथील १९ वर्षीय महिला अशा दोन महिलांना कोरोनाची लागण झाली असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
निगडे मोसे येथील कोरोना बाधित महिलेच्या संपर्कातील ११ जणांचे स्वॅब घेण्यात आले होते. यातील सर्वांचे तपासणी अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तसेच आसनी दामगुडा येथील एका संशयित व्यक्तीचा स्वॅब तपासणीसाठी पाठवण्यात आला होता तर त्याचाही अहवाल निगेटिव्ह आला असून तूर्तास तरी कोरोनाची साखळी तुटला असल्याची माहिती वेल्ह्याचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अंबादास देवकर यांनी सांगितले.