करोनाबाधितांवर उपचारांसाठी बेड मिळेना : प्रशासनाची धावपळ सुरूच
पुणे – संसर्ग झालेल्या तसेच घरी विलगीकरण सुविधा नसलेल्या करोनाबाधितांना महापालिकेच्या कोविड केअर सेंटरमध्ये उपचारासाठी ठेवले जाते. त्यातही अतिसौम्य तसेच सौम्य लक्षणे असलेल्यांचा समावेश आहे. मात्र, त्यातील रुग्णांना अचानक श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्यास त्यांना तत्काळ उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यासाठी बेडच मिळत नसल्याचे प्रकार घडत आहेत.
शहरातील नव्या करोना बाधितांना सौम्य लक्षणे अथवा लक्षणे नसल्यास घरीच विलगीकरणात राहण्याच्या अटीवर सोडण्यात येत आहे. मात्र, ज्यांच्या घरी जागाच नाही, असे बाधित कोविड केअर सेंटरमध्येच राहतात. तेथे काही रुग्णांना अचानक श्वास घेण्यास त्रास होत असल्याने तातडीने ऑक्सिजनची गरज भासत आहे.
मात्र, अशा वेळी या रुग्णांना घेऊन महापालिकेचे पथक शहरभर बेड शोधत आहे. त्यानंतरही बेड मिळाला, तर ठीक नाहीतर या रुग्णांना थेट व्हेंटिलेटरवर ठेवावे लागत आहे. त्यामुळे अशा अचानक उद्भवलेल्या स्थितीत बेडच मिळत नसल्याने सेंटरच्या यंत्रणेची चांगलीच तारांबळ उडत आहे. या बाधितांसाठी काही प्रमाणात बेड शिल्लक ठेवावेत, अशी मागणी या सेंटरच्या अधिकाऱ्यांनी केली आहे. कोविड केअर केंद्र संचालकांनी ही कैफियत मांडताच महापालिकेने प्रत्येक केंद्रात ऑक्सिजन बेडची सुविधा उपलब्ध करण्याचा निर्णय घेतला आहे.
त्यासाठी प्रत्येक ठिकाणी किमान 50 ते 100 बेड उभारण्याची प्रशासनाची तयारी आहे. यासाठी दोन कोटी रुपयांची निविदा प्रक्रिया राबविण्यात आली आहे. या निविदा लवकरच मंजूर करून हे बेड उभारले जाणार आहेत.