कोविड केअर सेंटरमध्ये ‘हवाहवाई’

पंखे बसविण्याच्या कामावर 39 लाखांचा खर्च

पुणे – एकीकडे सुविधांअभावी पुणेकरांना जीव गमवावा लागत असताना दुसरीकडे कोविड केअर सेंटरमध्ये फॅन बसवण्यासाठी महापालिकेने तब्बल 39 लाख रुपये खर्च केले असल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे एका पंख्यांची किंमत कमीत कमी आठ हजार रुपये असून ते बसवण्यासाठी कोणतीही मान्यता घेण्यात आली नसल्याचे उघड झाल्याने पालिकेचा कारभारच सध्या हवेत चालल्याचे समोर आले आहे.

संबंधित कंपनीशी पंख्याबाबतचा करार करणे आणि त्यांना बिल अदा करण्याबाबतचा प्रस्ताव महापालिकेच्या विद्युत विभागाने स्थायी समितीपुढे मंजुरीसाठी ठेवला आहे.
शहरात करोना बाधितांना विलगीकरण करण्यासाठी महापालिकेकडून कोविड केअर सेंटर सुरू करण्यात आले होते. एका वेळेस नऊ हजार रुग्ण त्यामध्ये राहू शकतील, अशी व्यवस्था उभारण्यात आली असल्याचे महापालिकेकडून सांगण्यात आले होते.

प्रत्यक्षात गेल्या चार महिन्यात या कोविड केअर सेंटरमध्ये अडीच हजार रुग्ण राहिले असल्याचे समोर आले आहे. या सेंटरमध्ये जेवणासह पुरेशा सुविधा नाहीत, अशा अनेक रुग्णांच्या तक्रारी आल्या होत्या, असे असताना या कोविड केअर सेंटरमध्ये पंखे बसवण्यासाठी महापालिकेने 39 लाख रुपये खर्च केले असल्याचे उघडकीस आले आहे.

हे पंखे आधीच बसवण्यात आले असून, त्यासंबंधीचा करार “मे. पवन क्विक सर्व्हिस’ यांच्याबरोबर करण्यासंबंधीचा हा प्रस्ताव आहे. महापालिकेच्या लोहगाव एसआरए, हडपसर एसआरए, खराडी स्टेडियम, बालेवाडी स्टेडियम, सणस ग्राऊंड, हडपसर ग्लायडिंग सेंटर येथील विलगीकरण कक्षात हे पंखे बसवण्यासंदर्भात निविदा मागवण्यात आल्या होत्या. आठ निविदा त्यासाठी आल्या त्यातील “मे पवन क्विक सर्व्हिस’ यांची निविदा सर्वात कमी म्हणजे जीएसटीसह 39 लाख 19 हजार रुपयांची आल्याने त्यांच्याशी करार करणे आणि त्यांना रक्कम अदा करणे, असे या प्रस्तावात नमूद केले आहे.

दरम्यान, खरेदीचा प्रस्ताव आता जरी महापालिका स्थायी समिती मध्ये आला असला तरी त्याची खरेदी आधीच झाली असून ती टप्प्याटप्प्याने करण्यात आली आहे, असे महापालिकेच्या विद्युत विभाग प्रमुख श्रीनिवास कंदुल यांनी सांगितले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.