चीन आखणार एव्हरेस्टवर कोविड सीमा रेषा

बीजिंग  – जगातिक सर्वात उंच शिखर असलेल्या माऊंट एव्हरेस्टवर नेपाळच्या बाजूने चढाई करणाऱ्या गिर्यारोहकांकडून कोविड-19 चा प्रसार होऊ नये म्हणून चीन एव्हरेस्टवर एक स्वतंत्र कोविड सीमा रेषा आखणार आहे. चीनमधील शिन्हुआ या सरकारी वृत्तसंस्थेने ही माहिती दिली. चीनच्या बाजूने गिर्यारोहक एव्हरेस्टवर पोहोचण्यापूर्वी तिबेटी गिर्यारोहकांच्या एका पथकाकडून एव्हरेस्टवर ही सीमा रेषा आखली जाणार आहे, असे या वृत्तात म्हटले आहे.

विभाजन रेषा कशापासून बनविली जाईल हे स्पष्ट नाही. चीनमधून एव्हरेस्टच्या उत्तरेकडून चढून जाणाऱ्या गिर्यारोहकांना रेषा ओलांडून, दक्षिणेकडील बाजूस किंवा नेपाळच्या बाजूने कोणा व्यक्‍ती किंवा वस्तूच्या संपर्कात येण्यास मनाई असेल. या विभाजन रेषेबाबत नेपाळ सरकार आणि पर्वतारोहण अधिकाऱ्यांनी त्वरित कोणतेही भाष्य केले नाही.

करोनाच्या साथीमुळे एव्हरेस्टवरील गिर्यारोहण मोहिमांना दोन्ही देशांनी गेल्यावर्षी बंदी घातली होती. यावर्षी नेपाळने 408 विदेशी गिर्यारोहकांना मोहिमांसाठीचे परमिट दिले आहे. पर्यटनातून मिळणारा महसूल वाढवण्याच्या उद्देशाने ही परवानगी देण्यात आली आहे. तर उत्तरेकडील बाजूने एव्हरेस्टवर चढाई करण्यासाठी 21 चिनी गिर्यारोहकांना परवानगी दिली गेली असल्याचे शिन्हुआ वृत्तसंस्थेने म्हटले आहे. चीनमध्ये देशांतर्गत विषाणू संसर्गाला मोठ्या प्रमाणावर आळा घातला गेल्याचा दावा केला जातो आहे. तर नेपाळमधील संसर्ग आणि मृतांच्या संख्येमध्ये अलिकडच्या काही दिवसात मोठी वाढ दिसून आली आहे. नेपाळमधील सर्व मोठी शहरे आणि प्रमुख गावांमध्ये लॉकडाऊन लागू आहे. तर देशांतर्गत आणि विदेशी विमानसेवाही थांबवण्यात आली आहे. एव्हरेस्टवर कोणत्याही प्रकारे प्रादुर्भाव झाल्याबाबत नेपाळमधील अधिकाऱ्यांनी बोलण्यास नकार दिला आहे. नॉर्वेच्या एका गिर्यारोहकाला एव्हरेस्टवरील मोहिमेनंतर करोनाचा संसर्ग झाला होता आणि प्रकृतीत सुधारणा झाल्यावर तो मायदेशी परत गेला होता.

संसर्ग केवळ अशक्‍य…
एव्हरेस्टवर अशाप्रकारे कोणतीही विभाजन रेषा आखली जाऊ शकत नाही, असे दीर्घकाळापासून पर्वतारोहण व्यवसायाशी निगडीत असलेल्या आंग त्शेरींग शेरपा यांनी सांगितले. दोन्ही बाजूकडील गिर्यारोहक एकत्र येऊ शकतील असे एकमेव ठिकाण असून ते म्हणजे एव्हरेस्टचा माथा हे आहे. या ठिकाणी केवळ फोटो काढण्यासाठी गिर्यारोहक अगदी काही मिनिटेच एकत्र थांबू शकतात. यावेळी गिर्यारोहकांच्या शरीरावर अवजड ट्रेकिंग सूट असतात, चेहऱ्यावर शिरस्त्राण, ऑक्‍सिजन मास्क असतो. त्यामुळे विषाणूचा संसर्ग होण्याची शक्‍यता अशक्‍यच आहे. श्‍वसनाला त्रास असलेला कोणीही इतक्‍या उंचीवर पोहोचूही शकणार नाही, असेही त्यांनी सांगितले.

 

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Comments are closed.