लंडन – ब्रिटनमधील काही शास्त्रज्ञांनी अशा अनोख्या उपकरणाचा शोध लावला आहे ज्याच्या सहाय्याने करोना रुग्णाचा फक्त पंधरा मिनिटात शोध घेणे शक्य होणार आहे. एखाद्या खोलीत विविध व्यक्ती जर जमले असतील तर त्या व्यक्तीपैकी कोणी जर करोनाग्रस्त असेल तर त्या खोलीतील अलार्म वाजेल आणि पंधरा मिनिटातच ही गोष्ट समोर येईल.
खोलीचा आकार मोठा असेल तर मात्र ही गोष्ट समजण्यासाठी अर्धा तास लागेल. आगामी कालावधीमध्ये विमानातील केबिन, क्लास रूम, केअर सेंटर्स, घर आणि कार्यालयांमध्ये हे तंत्रज्ञान महत्त्वाचे ठरणार आहे. उपकरणाचे नाव कोविड अलार्म असे ठेवण्यात आले. आगीची सूचना देणाऱ्या स्मोक अलार्मपेक्षा हे उपकरण थोडे मोठे आहे. लंडन स्कूल ऑफ हायजीन अँड ट्रॉपिकल मेडिसीन आणि डरहम युनिव्हर्सिटी या
दोन संस्थांमधील वैज्ञानिकांनी संयुक्तपणे प्रयोग करून या संशोधनात यश मिळवले आहे. वैज्ञानिकांनी जेव्हा चाचणी केली तेव्हा त्याचे निष्कर्ष 98 ते शंभर टक्के खरे आले. करोना रोग शोधण्यासाठी सध्या आरटीपीसीआर आणि अँटिजेन टेस्ट या दोन चाचण्या वापरल्या जातात; पण त्यापेक्षाही ही अलार्म सिस्टीम जास्त प्रभावी असल्याचा संशोधकांनी दावा केला आहे. एखाद्या खोलीत असलेल्या विविध व्यक्तींपैकी कोणाला करोनाचे संक्रमण झाले आहे, हे शोधण्यासाठी मात्र पुन्हा एकदा चाचणी करून घ्यावी लागते.
एखाद्या खोलीत जर जास्त लोक जमले असतील तर त्यामध्ये जर कोणी संक्रमित रुग्ण असेल तर आपोआप हा अलार्म वाजणार आहे. त्यानंतर खोलीत असलेल्या प्रत्येकाची व्यक्तिगत चाचणी करून शोध घेतला जाणार आहे. या संशोधकांनी दिलेल्या माहितीप्रमाणे फक्त करोना नव्हे तर इतर अनेक रुग्णांचा शोध घेण्यासाठी ही अलार्म सिस्टम महत्त्वाची ठरू शकते.
डरहॅम युनिव्हर्सिटीतील बायोसायन्स प्रोफेसर लिंडसे यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे प्रत्येक रोगाचा एक स्वतंत्र असा वास असतो त्या वासाच्या सहाय्याने रुग्णांचा शोध घेणे शक्य आहे. यासाठी हे उपकरण विकसित करण्यात आले असून त्याची किंमत फक्त पाच लाख 15 हजार रुपये आहे.