बारामती (प्रतिनिधी) : कोरोना चा प्रादुर्भाव कमी करण्याच्या अनुषंगाने बारामती तालुक्यात प्रभावीपणे लसीकरण करण्यात आले. आतापर्यंत 3 लाख 76 हजार 785 नागरिकांना लसीकरण करण्यात आले आहे. शहर व तालुक्यात सरासरी एकूण 89 टक्के लसीकरण झाले आहे. ग्रामीण भागातील हे प्रमाण 95 टक्के आहे. 36 हजार नागरिकांचा अद्यापही पहिला डोस झाला नाही. हर घर दस्त या अभियानांतर्गत पहिला व दुसरा डोस राहिलेल्या नागरिकांची शोध मोहीम सुरू आहे. यासाठी 445 पथके तालुक्यात कार्यरत असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. मनोज खोमणे यांनी दिली.
हर घर दस्त या अभियानाची सुरुवात 11 नोव्हेंबर रोजी सुरू झाली आहे. 30 नोव्हेंबर पर्यंत हे अभियान सुरु राहणार आहे. तालुक्यातील सर्व गावात हे अभियान राबविण्यात येत असून लसीकरणाचा पहिला व दुसरा डोस राहिलेल्या नागरिकांची नोंदणी या अभियानांतर्गत सुरू आहे.
एकूण लसीकरण – 3 लाख 76 हजार 785
पहिला डोस – 2 लाख 34 हजार 498
दुसरा डोस – 1लाख 42 हजार 287
आशा स्वयंसेविका, आरोग्य सेवक व अंगणवाडी सेविकांचा हर घर दस्त पथकात समावेश आहे. या अभियानांतर्गत आतापर्यंत पहिला डोस न घेतलेल्या 2 हजार 716 तर दुसरा डोस न घेतलेल्या 4 हजार 958 नागरिकांची नोंदणी करण्यात आले आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी बारामती शहर व तालुक्यात मोठ्या प्रमाणात लसीकरण करण्यात आले आहे. असे असलेतरी देखील 36 हजाराहून अधिक नागरिकांनी पहिला डोस अद्याप घेतलेला नाही.प्रत्येक नागरिकाचे लसीकरण व्हावे या उद्देशाने हर घर दस्त हे अभियान राबविण्यात येत आहे. नागरिकांनी त्याला प्रतिसाद देणे गरजेचे आहे. या अभियानाअंतर्गत आत्तापर्यंत ७ हजार ६७४ नागरिकांची नोंद करण्यात आली आहे. स्वयंसेवी संस्था, राजकीय पदाधिकारी तसेच कंपन्यांच्या सहकार्याने शिबिरांच्या माध्यमातून लसीकरण केले जाईल.
– डॉ. मनोज खोमणे (तालुका वैद्यकीय अधिकारी)
सद्यस्थितीमध्ये कोविशिल्ड 55 हजार व कोवॅक्सिंन 3 हजार आसे एकूण लसीचे 58 हजार डोस आरोग्य विभागाकडे शिल्लक आहेत . नागरिकांनी लसीकरण करून घ्यावे असे आवाहन आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.