आरोग्यदायी डार्क चॉकलेटचे ‘हे’ आश्चर्यचकित फायदे नक्की जाणून घ्या…

कोको झाडाच्या बियांपासून (कोको बिन्स) चॉकलेट बनवतात. चॉकलेट हे प्रामुख्याने दोन प्रकारचे असते – मिल्क चॉकलेट किंवा डार्क चॉकलेट. यातला आरोग्यदायी प्रकार म्हणजे डार्क चॉकलेट. आपल्या सर्वांना माहीत आहे की, मिल्क चॉकलेटमध्ये भरपूर प्रमाणात उष्मांक, साखर आणि स्निग्ध पदार्थ असे आरोग्यासाठी घातक घटक असतात. मिल्क आणि डार्क चॉकलेट बनवायची पद्धत बऱ्यापैकी सारखीच आहे. फक्त मिल्क चॉकलेटमध्ये दुधाचे पदार्थ, कन्डेन्स्ड मिल्क आणि भरपूर साखर असते. यामुळेच आरोग्याच्या बाबतीत डार्क चॉकलेटला प्राधान्य
दिले जाते.
डॉ. मानसी गुप्ता-पाटील

डार्क चॉकलेट नक्की कसे बनते?

डार्क चॉकलेटमध्ये कोको बिन्स, साखर आणि चॉकलेटची चव तसेच पोत टिकवून ठेवण्यासाठी वापरण्यात येणारे सोया लेसिथिनसारखे इमल्सिफायर यांचा समावेश असतो. शिवाय त्यात व्हॅनिला, क्रेनबेरी, अंजीर, बटरस्कॉचसारखे फ्लेवर्सही वापरण्यात येतात. कोकोमध्ये खनिजद्रव्ये व ऍण्टीऑक्‍सिडन्टस्‌ विपुल प्रमाणात असतात. त्यामुळे डार्क चॉकलेटही लोह आणि मॅग्नेशियमसारख्या खनिजांनी आणि फ्लेवोनॉईड्‌स, पॉलीफिनॉल्स यासारख्याऍण्टीऑक्‍सिडन्टस्‌ने समृद्ध असते. ऍण्टीऑक्‍सिडन्टस्‌ आपल्या शरीरात तयार होणाऱ्या ऑक्‍सिजनच्या हानिकारक फ्री-रॅडिकल्सना निष्प्रभ करते. त्यामुळे ऑक्‍सिडेटीव्ह स्ट्रेस कमी होऊन वृद्धत्वाची प्रक्रिया मंदावते. यामुळे मधुमेह, हृदयविकार, डोळ्यांचे काही आजार, पार्किन्सन्स, अल्झायमर्ससारख्या विकार यांना दूर ठेवण्यास मदत होते.

आता डार्क चॉकलेटचे प्रमुख फायदे बघू.

डार्क चॉकलेट वाढलेले वजन कमी करायला मदत करू शकते. बरेच संशोधन अभ्यास असे सुचवतात की, जेवणाआधी आणि जेवणानंतर 15 मिनिटांच्या अंतराने डार्क चॉकलेट खाल्ल्यास भूक जवळपास 35% ने कमी होते. चॉकलेट खाल्ल्याने पचनाची प्रक्रिया संथगतीने होते त्यामुळे पुढच्या जेवणापर्यंत पोट भरल्याची भावना टिकून राहाते. जास्त चॉकोलेट्‌स खाणाऱ्या मुलांचा व प्रौढ व्यक्तींचा बॉडी मास इंडेक्‍स कमी असतो. असेही दिसून आले आहे. वाढलेल्या वजनासाठी ही तर मेजवानीच समजायला हवी आहे!

डार्क चॉकलेट

ऍण्टीऑक्‍सिडन्टस्‌चा उत्तम स्रोत. आधी उल्लेख केल्याप्रमाणे डार्क चॉकलेटमध्ये शरीराला उपयुक्त असे भरपूर ऍण्टीऑक्‍सिडन्टस्‌ असतात – अगदी अनेक फळांपेक्षाही जास्त. या ऍण्टीऑक्‍सिडन्टस्‌मुळे शरीरातील पेशी नाश पावण्याचा वेग कमी होतो आणि शरीरास फायदा होतो.

डार्क चॉकलेट पोषक आहे

डार्क चॉकलेट तंतूमय पदार्थ आणि खनिजद्रव्यांनी समृद्ध आहे. त्यात लोह, कॉपर, मॅग्नेशियम, मॅंगनीज, फॉस्फरस, झिंक आणि सेलेनियम यांचे प्रमाण भरपूर आहे. पण डार्क चॉकलेट खाताना हे देखील लक्षात ठेवले पाहिजे की त्यात स्निग्ध पदार्थ आणि कॅलरीजचे प्रमाण देखील भरपूर आहे.

त्यामुळे ते खाताना त्याच्या प्रमाणावर नियंत्रण ठेवणे महत्त्वाचे आहे. डार्क चॉकलेटमधील स्निग्ध पदार्थ तितकेसे वाईट नसतात. त्यात मोनो-अनसॅच्युरेटेड प्रकारचे स्निग्ध पदार्थ जास्त असतात तर पॉली-अनसॅच्युरेटेड प्रकारचे कमी.

डार्क चॉकलेट तुमचा रक्तप्रवाह आणि रक्ताभिसरण सुधारू शकते.

डार्क चॉकलेटमध्ये फ्लेवोनॉईड्‌स असतात. त्यांच्यामुळे रक्तातील प्लेटलेट्‌स एकमेकाला चिटकत नाहीत आणि रक्ताची गुठळी तयार न झाल्याने हृदयविकार व अर्धांगवायूचा प्रतिबंध होतो. याहीपुढे जाऊन चॉकलेटमुळे नायट्रिक आम्ल स्रवले जाते व रक्तवाहिन्या प्रसरण पावतात. यामुळे रक्तदाब कमी होतो आणि हृदयाची कार्यक्षमता वाढते. चॉकलेटमधील पॉलिफिनॉल्स आणि थिओब्रोमिनमुळे म्हणजे वाईट प्रकारचे कोलेस्टेरॉल कमी व्हायला मदत होते तर म्हणजे चांगल्या प्रकारचे कोलेस्टेरॉल वाढते. यामुळे हृदयाला संरक्षण मिळते.

डार्क चॉकलेट त्वचेसाठी चांगले असते.

डार्क चॉकलेटमधील फ्लेवोनॉल्समुळे त्वचा चांगली दिसते. त्यातील ऍण्टीऑक्‍सिडन्टस्‌ त्वचेला किरणांपासून वाचवतात, त्वचेचा रक्तपुरवठा सुधारून त्वचेला तकाकी देतात, सुरकुत्या कमी करतात. फ्लेवोनॉल्स्मुळे त्वचेतील पाण्याचे प्रमाण आणि त्वचेची जाडी योग्य प्रमाणात राहाते. थोडक्‍यात डार्क चॉकलेट तुम्हाला सुंदर बनवते.

डार्क चॉकलेट तुम्हाला हुशार बनवू शकते!

संशोधनात असे दिसले आहे की, डार्क चॉकलेटमुळे मेंदूचा रक्तपुरवठा वाढतो आणि त्यामुळे स्मरणशक्ती वाढते, प्रतिक्रियेचा वेळ कमी होतो, एखादी अडचण सोडवण्याची क्षमता वाढते. पुढच्या वेळी परीक्षा देताना फक्त शुभेच्छा म्हणूनच नाही, तर मेंदूला चालना देण्यासाठीही डार्क चॉकोलेट्‌सचा वापर करा! डार्क चॉकलेट मेंदूची क्षमता टिकवून ठेवते आणि पार्किन्सन्स, अल्झायमर्स यासारख्या आजारांपासून वाचवते.

डार्क चॉकलेटचे सूज-विरोधी परिणाम:

डार्क चॉकलेट शरीरातील सूज आणि दाह कमी करते. ते संधिवाताच्या रुग्णांसाठीही लाभदायक असते.

मधुमेहींनी डार्क चॉकलेट खाणे सुरक्षित आहे का?
डार्क चॉकलेट इन्शुलिनला होणारा अवरोध कमी करायला आणि रक्तदाब कमी करायला मदत करते असे दिसून आले असले, तरी हे अजून पुरेसे स्पष्ट झालेले नाही. त्यामुळे मधुमेहींनी डार्क चॉकलेट खाण्याबाबत आणि त्याच्या प्रमाणाबाबत दक्षता घ्यायला हवी.

थोडक्‍यात

डार्क चॉकलेटचे अनेक फायदे आहेत. साधारण 20 ते 30 ग्रॅम डार्क चॉकलेटचा रोजच्या आहारात समावेश करता येईल, पण त्यापूर्वी चॉकलेटवरच्या वेष्टनावरचे फूड लेबल वाचायला हवे. सध्या मिळणाऱ्या डार्क चॉकलेट्‌समध्ये खूप साखर आणि न्सिग्ध पदार्थ असल्याने ती तब्येतीसाठी चांगली नाहीत. जर डार्क चॉकलेटमध्ये कमीतकमी 70% कोकोचे प्रमाण असेल तर ते चॉकलेट खाऊन त्याचे फायदे मिळवता येतील.

कितीतरी लाभ…

अशा प्रकारे डार्क चॉकलेट हे किती विविधतापूर्ण आणि आरोग्यदायी आहे, हे आपण पाहिले. मात्र, ज्याप्रकारे आपण डार्क चॉकलेटकडे एक समस्या म्हणून पाहतो, तसे न पाहता, त्याची उपकारकता समजून घेणे आवश्‍यक ठरते. आपल्यालाही डार्क चॉकलेट असेच आरोग्य संपन्न करेल, अशी खात्री आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.