ढापण लावलेला घोडा

“सर, या काचेचा क्षितीजसमांतराशी कोन किती आहे तो तुम्ही मोजायला सांगितलाय’, एका अभियंत्याचा तक्रारीचा सूर.
“मग?’
“कंपनीच्या मॅनेजरनं कोनमापक देतो म्हणून दोन दिवसांपूर्वीच सांगितलं होतं. त्यानं तो अजून दिला नाहीये.’
“मग?’
“मग काय सर? कोन कसा मोजणार?’ अभियंता आता काहीसा चिडला होता.
“विचार कर. मी पंधरा मिनिटांत येतो’, असं म्हणून मी निघून गेलो.
हा प्रकार घडला एका चीनमधील कंपनीत. त्या कंपनीनं आम्हाला काही वाहनांचा तौलनिक अभ्यास करण्याकरता कंत्राटी काम दिलं होतं. मी 10-12 अभियंत्यांच्या चमूचा प्रमुख होतो. पंधरा मिनिटांनंतर मी परत आलो तरी अभियंता चिंताक्रांतच होता.
“सर, सांगा ना मॅनेजरला कोनमापक द्यायला,’ अभियंता कळवळून म्हणाला.
“का? विचार करून मार्ग सापडत नाही?’ मी विचारलं.
“नाही, सर. कोनमापकाशिवाय कसा कोन मोजणार?’
“तू म्हणजे ढापण लावलेला घोडा आहेस!’
“म्हणजे?’

“ढापण लावलेला घोडा जसा ठराविक मार्गानं चालत असतो ना, तसा तू आहेस. दुसऱ्या कुठल्या मार्गानं प्रश्‍न सोडवण्याचा विचारही करत नाहीयेस तू’, मी म्हणालो. त्याच्या चेहऱ्यावरचं प्रश्‍नचिन्ह पाहून मी पुढं म्हणालो, “तो कोपऱ्यातला दोरा घेऊन त्याच्या एका टोकाला हा इथला जड नट बांध.’
मग मी त्याला हा ओळंबा तिरक्‍या काचेच्या वरच्या टोकापासून खाली सोडायला सांगितला. नंतर ओळंब्याच्या दोरी व काचेचे दुसरे टोक यातलं अंतर आणि ओळंब्याच्या दोरीची लांबी मोजायला सांगितली.

“आता काय करायचं सर?’
“माझं कपाळ! अरे, या दोन्ही अंतरांचं गुणोत्तर काढ. तुला हव्या असलेल्या कोनाची ती टॅंजंट म्हणजे स्पर्शज्या असेल. त्यावरून कोन काय आहे हे कोष्टकावरून काढता येईल. झालं ना कोनमापकाशिवाय काम?’ ढापण लावलेल्या घोड्यासारखी परिस्थिती वारंवार दिसून येते. असंच एकदा फरशीचा उतार कोणत्या दिशेला आहे हे पाहण्याकरता एक जण स्पिरीट लेव्हल मागू लागला. पण प्रत्येक कोपऱ्यात पाणी ओतून ओघळाच्या प्रवाहावरून उतार लगेच उमगला. तसंच स्क्रू ड्रायव्हरचं काम साधा चमचा करू शकतो-हे मी अनुभवलेलं आहे.

एकदा दुचाकीवरून जात असताना माझ्या खिशातील मोबाइल रस्त्यावर पडला. नशिबानंच तो वाचला. असं पुन्हा होऊ शकतं हे माझ्या लक्षात आलं. मी एका कंपनीत तेव्हा सल्लागार म्हणून काम करीत होतो. तिथं खिशाला आय-कार्डचा बॅज लावावा लागे. उपस्थितीची नोंद तो बॅज एका यंत्रासमोर धरून होई. बॅज यंत्रापर्यंत सुलभतेनं जावा यासाठी त्याला दोरी लावलेली होती. ती आपोआप मागे ओढली जात असे. तीच छोटीशी यंत्रणा मी माझ्या विजारीला अडकवली आणि दोरीच्या टोकाला मोबाइल बांधून खिशात ठेवला. आता मोबाइल खिशातून निसटला तरी दोरीला लटकून राही आणि फोन आला की मी तो न काढता खुशाल कानापर्यंत नेऊन ऐकू शकत होतो आणि दोरी मागे ओढून घेता येत असल्यानं नंतर लीलया परत खिशात ठेवू शकत होतो. हा प्रकार पाहून अनेकांना अचंबा वाटत असे पण हे उपलब्ध वस्तूंपासून निर्मिलेलं समस्येचं निराकरण होतं. नवनिर्मितीवर व्याख्यान देताना अनेक वेळा मी मोबाइल खिशातून काढून खाली टाकीत असे. तो जमिनीवर न पडता हवेतच लटकत राहतो आणि विनासायास वापरताही येतो हे पाहून विद्यार्थ्यांना योग्य तो धडा मिळत असे.

अनेकदा प्रश्‍न आणि त्याची उकल अगदी जवळजवळ असतात पण आपली ढापण लावलेल्या घोड्यासारखी परिस्थिती असल्यानं प्रश्‍नाचं समाधान आपल्या लक्षात येत नाही. याचं सर्वात गमतीचं उदाहरण मला एकदा पाहायला मिळालं. संयुक्‍त राष्ट्रसंघानं शेवग्याच्या गुणधर्मांवर एक पुस्तिका प्रसिद्ध केलेली आहे. शेवग्याच्या सुकलेल्या पिवळ्या पानांमध्ये दुधापेक्षाही जास्त पोषणद्रव्यं असतात ही माहिती तसंच शेवग्याच्या विविध भागांमधले औषधी व इतर गुणधर्म असं बरंच काही त्या पुस्तिकेत होतं. शेवटून दुसऱ्या पानावर ज्या देशांमध्ये कुपोषणाची समस्या आहे ते देश जगाच्या नकाशावर दाखवले होते आणि शेवटच्या पानावर ज्या देशांमध्ये शेवगा मुबलक पिकतो ते देश (भारतासह) दाखवले होते. गंमत अशी की दोन्ही नकाशातील देश सारखेच होते! म्हणजेच जिथं समस्या तिथंच उकलही आहे. पण ढापण लावल्यावर काय होणार?

श्रीनिवास शारंगपाणी

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.