कव्हर स्टोरी – दहावीचा निकाल : मीमांसा आणि धडा (भाग २)

कव्हर स्टोरी – दहावीचा निकाल : मीमांसा आणि धडा (भाग 1)

डॉ. अ. ल. देशमुख

राज्यातील दहावीच्या परीक्षांचा निकाल नुकताच लागला. यंदा 77 टक्‍के विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून गेल्या 9 वर्षांतील हा नीचांक असल्यामुळे त्यावरून बरीच आरडाओरड आणि टीकाटिप्पणी सुरू आहे. वस्तूतः मागील काळात उत्तीर्णांचा टक्‍का वाढला होता, उत्तम गुण मिळवणाऱ्यांची संख्या वाढली होती तेव्हाही शिक्षणात काही राहिले नाही, असे म्हणत टीका केली जात होती. त्यामुळे आताच्या निकालाकडे या टीकेपलीकडे जाऊन विचार करायला हवा. टक्‍का घसरण्याची कारणे काय आहेत? त्याची जबाबदारी कोणाची आहे? 22 टक्‍के विद्यार्थी मराठीत अनुत्तीर्ण होण्याची कारणे काय आहेत? आणि या निकालाचे परिणाम काय होणार आहेत? आदी मुद्द्यांचा वेध.

अशा वेळी मातृभाषेमध्ये आलेले हे अपयश आपल्याला कोणालाही रूचणारे, रूजणारे नाही. यावरुन शासनाचे मराठी विषयीचे प्रेम बेगडी आहे हे स्पष्ट होते आहे. मराठीची अवहेलना, मराठी माध्यमांच्या शाळांकडील दुर्लक्ष केल्याने मराठीची ही दुरवस्था निर्माण झालेली आहे. निकालातून हा भाग समोर आला आहे. महाराष्ट्रातील सर्व शाळांनी केवळ इंग्रजी माध्यमाचा तिरस्कार करून भागणार नाही तर मराठीचा दर्जा वाढवण्याचा प्रयत्न करावा. दुसऱ्याला कमी लेखून किंवा त्याचे वाईट चिंतून आपण मोठे होत नसतो. मराठीमध्ये 22 टक्के विद्यार्थी नापास होत असतील तर मराठी माध्यमांच्या सर्वच शाळांनी याला उत्तर देण्याची गरज निर्माण झालेली आहे.

वेगळ्या दृष्टीकोनातून पाहिल्यास यंदाचा निकाल हा गेल्या वर्षीपेक्षा 12 टक्‍क्‍यांनी कमी आहे. याचा अर्थ गेल्या वर्षीपेक्षा 12 टक्के विद्यार्थी यावर्षाच्या अकरावीच्या प्रवेशासाठी कमी आहेत. मागील काळात निकालाची टक्केवारी वाढत गेल्याने अनेक संस्थांनी शासनाकडून विविध मार्गांनी 11 वीच्या तुकड्या वाढवून घेतल्या. अकरावीची तुकडी वाढवून घेऊन त्यामधून शिक्षण देण्याबरोबर आर्थिक लाभही संस्थांना मिळवून देण्याचा प्रयत्न मोठ्या प्रमाणावर झाला आहे. आता यावर्षीच्या निकालामुळे तुकड्या पूर्णपणे भरल्या नाहीत तर तो दोष निकाल कमी लागल्याचा नसून संस्थांनी दूरदर्शी विचार न केल्याचा तो परिणाम आहे. अकरावीच्या किती तुकड्यांना मान्यता द्यायची, हे शासनाला कळावयास हवे होते. भारमभार तुकड्यांना मान्यता देणे आणि शिक्षणाचा चुकीचा प्रसार करणे याचे परिणाम यावर्षी दिसणार आहेत. पण निकालाचा यात काहीही दोष नाही.

गेल्या काही वर्षांत दहावी आणि बारावी दोन्हीही परीक्षांमध्ये मुलांपेक्षा मुलींचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण सातत्याने वाढते आहे. याहीवर्षी ते वाढलेले दिसते आहे. इथे मुला-मुलींची तुलना करण्याचा विचार नाही आणि ती करूही नये. मात्र मुलींमध्ये अभ्यास एके अभ्यास हे एकच ध्येय असते. त्यामुळे मुलींना उत्तम प्रकारे गुण मिळताहेत. बहुतेकदा मुलांचा मुलभूत स्वभाव एकाच ध्येयाकडे आकर्षित होणारा नसतो. त्यांचे लहानपणापासूनच अनेक डगरींवर हात असतात. त्यांच्यामध्ये हूडपणा असतो, व्यायामाची आवड असते, मनोरंजनाची कल्पना असते, खेळाची आवड असते. चेष्टामस्करी करण्याची प्रवृत्ती असते. या सर्व गोष्टींचा परिणाम मुलांच्या मार्कांवर दिसून येतो. याचा अर्थ मुले बुद्धीमान नाहीत असा अजिबात नाही. आज मुलींच्या शिक्षणाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलत चालला आहे. त्याचाही परिणाम मुलींच्या यशामध्ये दिसून येतो आहे. मुलींना मिळणारे हे यश समाजामध्ये चांगले परीवर्तन घडवण्याच्या दृष्टीने अतिशय योग्य आहे. त्यामुळे समाजाने स्वतःची दृष्टी बदलण्याची गरज आहे.

शाळांच्या दृष्टीकोनातून विचार केल्यास राज्यात 100 टक्के निकाल लागणाऱ्या शाळांची संख्या खूप प्रमाणात घटलेली आहे. याचा ठपका शाळांनी जर नवा अभ्यासक्रम, नवी मूल्यमापन पद्धती किंवा अंतर्गत मूल्यमापनाचे बंद झालेले गुण याच्यावर ठेवल्यास ते चूकच आहे. आपल्या शाळेत दहा वर्षे विद्यार्थी असूनही 100 टक्के निकाल लावणे साध्य होत नसेल तर शाळांनी आणि शैक्षणिक संस्थांनी याबाबत आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. खरं म्हणजे एक तृतियांश गुणांनी विद्यार्थी पास होतो याचा अर्थ तो दोन तृतियांश अप्रगत राहतो; पण एक तृतियांश यशही शाळा विद्यार्थ्यांना मिळवून देऊ शकत नाहीत. ही चूक कोणाची? ती पालकांची नाही, विद्यार्थ्यांची नाही तर ती शाळांची आहे. शाळांनी, शैक्षणिक संस्थांनी याकडे गांभीर्याने लक्ष दिले पाहिजे.

माझ्या शाळेचा निकाल 100 टक्के लागेल यासाठी प्राधान्याने प्रयत्न केले पाहिजेत. त्याचबरोबर 90 टक्के, 92 टक्के, 97 टक्के गुण आमच्या शाळेतील विद्यार्थ्यांना पडले हे अभिमानाने सांगणाऱ्या शाळांना 17 टक्‍के विद्यार्थी अनुत्तीर्ण होणे, ही बाब शोभणारी नाही. गुणवान विद्यार्थी त्याच्या त्याच्या बुद्धीने गुण मिळवतो पण अनुत्तीर्ण विद्यार्थी हे शाळेचे अपयश असते. त्यामुळे ज्यांचा निकाल 100 टक्के लागला नाही त्या शाळांनी, संस्थांनी या निकालामधून काहीतरी बोध घेतला पाहिजे असे स्वच्छ आणि स्पष्ट शब्दांत म्हणावेसे वाटते.

Leave A Reply

Your email address will not be published.