नवी दिल्ली – देशात करोना विषाणू संसर्गाच्या दुसऱ्या लाटेने एप्रिल महिन्यापासून प्रचंड हाहाकार माजवला आहे. या लाटेत बाधितांच्या संख्येबरोबरच मृतांची आकडेवारी देखील वाढल्याचं पाहायला मिळालं. रुग्णांचे नातेवाईक ऑक्सिजन बेड्स, ऑक्सिजन सिलिंडर्स, रेमडीसिवीरसाठी धडपडतानाचे विदारक चित्र देखील देशाने पहिले. मे महिन्याच्या मध्यात विषाणूच्या दुसऱ्या लाटेचा वेग आता काहीसा कमी झाल्याचं आश्वासक चित्र निर्माण झालं आहे.
असं असलं तरी तज्ज्ञांनी दुसरी लाट सुरु असतानाच तिसऱ्या लाटेचा इशारा दिल्याने करोनाचे सावट इतक्यात तरी टळणार नसल्याचं दिसतंय. तिसऱ्या लाटेतील करोना विषाणू हा बालकांसाठी घातक ठरू शकतो असा दावाही तज्ज्ञांकडून केला जातोय. तिसऱ्या लाटेचा धोका कमी करण्यासाठी लसीकरण मोहिमेला वेग द्या असंही सांगण्यात आलंय.
याच पार्श्वभूमीवर आज केंद्रीय नीती आयोगाचे सदस्य वि के पॉल यांनी २ ते १८ वयोगटातील लसीकरणासाठीच्या क्लिनिकल चाचण्यांबाबत माहिती दिली आहे. भारत बायोटेकच्या COVAXIN लसीच्या दुसऱ्या व तिसऱ्या टप्प्यातील क्लिनिकल चाचण्यांना ड्रग्स कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने मान्यता दिली आहे.
या लसीच्या दुसऱ्या व तिसऱ्या टप्प्यातील चाचण्यांना येत्या १० ते १२ दिवसांमध्ये सुरुवात होईल असंही पॉल यांनी सांगितलं.
COVAXIN has been approved by the Drugs Controller General of India (DCGI), for Phase II/III clinical trials in the age group of 2 to 18 years. I have been told that trials will begin in the next 10-12 days: Dr. VK Paul, Member-Health, Niti Aayog #COVID19 pic.twitter.com/T0ITsJsixA
— ANI (@ANI) May 18, 2021