नेवासे -गिडेगाव येथे अल्पवयीन मुलीवर हल्ला केल्याप्रकरणी नेवासे पोलिसांनी मुलीच्या चुलत्याला अटक केली आहे.
गिडेगाव येथे सहावीत शिकणाऱ्या अल्पवयीन मुलगी 27 जून रोजी दुपारी घरात फरशी पुसत असताना अज्ञात व्यक्तीने घरात येऊन तिच्या डोक्यावर हातावर व तोंडावर चाकूचे आठ वार करून गंभीर जखमी केले होते. त्यानंतर अल्पवयीन मुलीने दिलेल्या फिर्यादीवरून नेवासे पोलीस ठाण्यात अज्ञाता विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या घटनेला 15 दिवसांचा कालावधी उलटूनही पोलीस यंत्रणेला आरोपीचे धागादोरे मिळत नव्हते. पोलीस अधीक्षक अखिलेश कुमार, अपर पोलीस अधीक्षक दीपाली काळे, उपअधीक्षक मंदार जवळे, पोलीस निरीक्षक रणजित डेरे यांच्या मार्गदर्शनाखाली तपासी अधिकारी उपनिरीक्षक भरत दाते यांनी या घटनेचा कसून तपास केला असता, या अल्पवयीन मुलीवर तिच्या सख्ख्या चुलत्यानेच चाकू हल्ला केल्याचे निष्पन्न झाले.