पिंपरी – पीएमपीने आपले घटलेले उत्पन्न वाढविण्यासाठी मागील काही दिवसांपासून प्रयत्न सुरू केले आहेत. अवैध वाहतूक रोखण्यासाठी वाहतूक पोलिसांची मदत घेऊन धडक कारवाईला सुरुवात केली आहे. मागील आठ दिवसांत अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या 15 खासगी वाहनांवर वाहतूक पोलिसांच्या मार्फत खटले दाखल केले असल्याची माहीती पीएमपीएमएलचे समन्वयक संतोष माने यांनी दिली.
खासगी अवैध वाहतूक रोखण्यासाठी पीएमपी आणि वाहतूक पोलिसांनी संयुक्तपणे धडक कारवाई सुरु केली आहे. पीएमपीएमएलच्या अधिकाऱ्यांनी वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त विनायक ढाकणे यांची मदत घेऊन कारवाईसाठी दोन पोलीस अधिकारी सोबत घेतले आहेत. दि. 8 मे ते 14 मे या दरम्यान पीएमपीएल व वाहतूक पोलिसांच्या पथकाने 15 खाजगी वाहनांवर कारवाई केली आहे. चार खासगी बस, एक मिनी बस, एक सहा सीटर आणि नऊ तीन सीटर गाड्यांवर खटले दाखल केले आहेत.