सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर ताब्यात घेण्यात आलेल्या स्ट्रक्चरल कंन्सल्टंट चेतन पाटीलला 5 दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. आज त्याला मालवणमधील दिवाणी न्यायालयात हजर करण्यात आले. पोलिसांनी राजकोटवरील शिवरायांचा पुतळा कोसळल्या प्रकरणी शिल्पकार जयदीप आपटे आणि स्ट्रक्चरल कंन्सल्टंट चेतन पाटील या दोघांवर गुन्हा दाखल केला आहे. तेव्हापासून दोघेही फरार होते.
शुक्रवारी अखेर कोल्हापूर पोलिसांनी चेतन पाटीलला अटक केली होती. महाराजांच्या पुतळा प्रकरणात चेतन पाटीलला पोलिसांनी गुरुवारी मध्यरात्री कोल्हापूरमधून ताब्यात घेतले होते. स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने ताब्यात घेतल्यानंतर मालवण पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले होते. दरम्यान, चेतन पाटील यांनी एका माध्यमांशी बोलताना सांगितले होते की, शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या उभारणीशी माझा कोणताही संबंध नाही.
मी नौदलाला केवळ शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासाठी उभारण्यात आलेल्या चबुतऱ्याचे डिझाईन तयार करुन दिले होते. या चबुतऱ्यावर 11 टन वजन असेल, असे मला सांगण्यात आले होते. त्यानुसार मी नौदलाला चबुतऱ्याचे डिझाईन तयार करुन दिले. यापलीकडे मी पुतळ्याचे कोणतेही काम केलेले नाही, असे त्याने म्हटले होते.