पेंटिंगच्या लिलावाची प्रक्रिया सुरूच राहणार; नीरव मोदीच्या कंपनीला तूर्त दिलासा देण्यास न्यायालयाचा नकार

याचिकेवर 1 एप्रिलला सुनावणी

मुंबई (प्रतिनिधी) – पंजाब नॅशनल बॅंकेला हजारो कोटी रुपयांचा गंडा घालणाऱ्या हिरेव्यापारी नीरव मोदीच्या पेटींगचा लिलाव करण्यास परवानगी देण्याच्या विशेष पीएमएलए न्यायालयाच्या निर्णयाविरोधात धाव घेणाऱ्या कंपनीला दिलासा देण्यास उच्च न्यायालयाने तूर्त नकार दिला आहे. न्यायालयाने केवळ याचिकेची दखल घेऊन आयकर विभागाला म्हणणे मांडण्याचे निर्देश दिले. त्यामुळे लिलावाची प्रक्रिया सुरूच राहणार आहे.

निरव मोदीच्या आतापर्यंत मनी लॉन्डरिंग कायद्यानुसार सुमारे 147 कोटीच्या मालमत्ता जप्त करण्यात आल्या आहे. त्यातील मौल्यवान वस्तूंबरोबरच पेंटिंगचा लिलाव करण्यास सत्र न्यायालयाच्या विशेष पीएमएलए न्यायालयाने ईडीला परवानगी दिली. न्यायालयाच्या या निर्णया विरोधात कॅमेलॉट एंटरप्रायझेस या कंपनीने याचिका दाखल केली आहे.

या याचिकेवर न्यायमूर्ती अकिल कुरेशी आणि न्यायमूर्ती सारंग कोतवाल यांच्या खंडपीठासमोर प्राथमिक सुनावणी झाली. यावेळी ईडीने जप्त केलेल्या 68 पेंटींगपैकी केवळ 19 पेंटींग या निरव मोदीच्या मालकीच्या आहेत, तर उर्वरीत पेंटींगचा मालकी हक्क हा अन्य कंपनींकडे असल्याने या लिलाव प्रक्रियेला स्थगिती द्यावी, अशी विनंती कंपनींच्या वतीने करण्यात आली. मात्र न्यायालयाने तूर्त दिलासा देण्यास नकार देत आयकर विभागाला 1 एप्रिलला आपले म्हणणे मांडण्याचे निर्देश देऊन याचिकेची सुनावणी तहकूब ठेवली.

आयकर विभागाकडे मोदीची सुमारे 95 कोटी रुपये थकबाकी आहे. ही थकबाकी वसुल करण्यासाठी पेंटिग्जचा लिलाव करण्याची परवानगी पीएमएलए न्यायालयाने दिली. सध्या या पेंटिग्ज अंमलबजावणी संचालनालयाच्या ताब्यात असून त्यात राजा रविवर्मा, व्ही एस गायतोंडे, एम.एफ. हुसैन, अकबर पदमसी आदी नामवंत कलाकारांच्या पेंटिग्जचा समावेश असून त्यांची कोट्यवधी रुपये किंमत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.