न्यायालयाच्या हस्तक्षेपामुळे विद्यार्थ्यांना गणवेश मिळण्याचा मार्ग मोकळा
पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या प्राथमिक व माध्यमिक विभागाच्या शाळा सुरू होऊन तीन आठवडे उलटलेले आहेत. तरीही विद्यार्थी शालेय साहित्यापासून वंचित राहिल्याने संबंधित ठेकेदाराला 10 जुलैपर्यंत गणवेश वाटपाचे आदेश देण्याची सूचना न्यायालयाने महापालिकेच्या शिक्षण विभागास केली आहे. त्यामुळे, गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेला ठेकेदार आणि आयुक्तांमधील वाद संपुष्टात आला आहे. तर विद्यार्थ्यांना गणवेश मिळण्याचाही मार्ग मोकळा झाला आहे.
शहरात महापालिकेच्या बालवाडी, प्राथमिक आणि माध्यमिक शाळांमध्ये सुमारे 55 हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. मात्र, शिक्षण विभागातील अनागोंदी कारभारामुळे अद्यापही शालेय साहित्यापासून विद्यार्थी वंचित राहिलेले आहेत. महापालिका आयुक्त, अतिरिक्त आयुक्तांनी पुर्वीचे करारनामे रद्द करुन ठेकेदारांचे नव्याने करारनामे करण्याबाबत सूचना केल्या होत्या. तसेच, शालेय साहित्य वाटपाविषयी डीबीटी योजना देखील राबवण्याची तयारी करण्याचे परिपत्रक काढण्यात आले होते.
मात्र, काही ठेकेदारांनी पुर्वीच्या करारनाम्यानुसार शालेय साहित्य वाटपाचे आदेश देण्याची मागणी केली होती. त्यास आयुक्त, अतिरिक्त आयुक्तांनी नकार दिल्याने ठेकेदार आणि आयुक्तांचा वाद न्यायालयात गेला होता. गणवेश वाटपाबाबत शिवाजीनगर न्यायालयाने महापालिकेच्या शिक्षण विभागास अगोदर सर्व शाळांमध्ये विद्यार्थ्यांना गणवेशाचे वाटप करा, त्याबाबत 10 जुलैपर्यंत ठेकेदारांना वाटपाचे आदेश द्यावेत, अशा सूचना केल्या आहेत.