देहुरोड – एका महिन्यात गरोदर राहून मूलबाळ होण्यासाठी औषध देतो असे सांगून तरुणाची 51 हजार 500 रुपयांची फसवणूक केली. या प्रकरणी देहुरोड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविला आहे. देहूगाव परंडवाल चौक येथे ही घटना घडली.
डॉ. करीम (रा. कांदा कॉलनी, पनवेल) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी 29 वर्षीय तरुणाने देहुरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, देहुरोड येथील एका दाम्पत्याला डॉ. करिम हा भेटला. त्यांना डॉ. करिम याने मूलबाळ होण्यासाठी औषध देतो, उपचार करतो एका महिन्यात “रिजल्ट’ देतो, असे सांगून होता. त्यावेळी फिर्यादी यांच्या पत्नीची तपासणी करून 40 हजारांची मागणी केली असता फिर्यादींनी 24 हजार 500 रुपये रोकड घेतले. तसेच डांगे चौक (वाकड) येथील अमृत आयुर्वेदिक मेडिकल येथून औषध आणण्यासाठी सांगितले. फिर्यादींनी 27 हजारांची औषधे आणली; मात्र त्यानंतर डॉ. करीम यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता फोन बंद असल्याने फिर्यादी यांच्या निदर्शनास आले. त्यानंतर फसवणूक झाल्याची तक्रार फिर्यादींनी दिली आहे. या प्रकरणी देहुरोड पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक संतोष येडे तपास करीत आहेत.