“सीएए’विरोधी आंदोलनात हिंसाचाराला चिथावणी
पहाटेच्या सुमारास पोलिसांच्या स्पेशल सेलची दक्षिण दिल्लीत कारवाई
नवी दिल्ली : इस्लामिक स्टेटशी संबंधित असलेल्या एका दाम्पत्याला दिल्ली पोलिसांनी आज सकाळी ताब्यात घेतले. दक्षिण दिल्लीतील जामिया नगर येथील ओखला भागातून आज पहाटेच्या सुमारास या दाम्पत्याला पोलिसांच्या विशेष विभागाने ताब्यात घेतले.
जहनझैब सामी आणि त्याची पत्नी हीना बशीर बेग अशी ताब्यात घेतलेल्या पती-पत्नीची नावे असून ते दोघेही “इस्लामिक स्टेट खुरासन प्रोव्हिन्स’या दहशतवादी संघटनेशी संबंधित असल्याचे या कारवाईशी संबंधित अधिकाऱ्याने सांगितले.
ताब्यात घेण्यात आलेले हे दोघेही अफगाणिस्तानमध्ये असलेल्या “आयएसकेपी’च्या वरिष्ठ सदस्यांच्या संपर्कात होते. नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात हिंसाचार भडकावण्यामध्ये या दोघांचा सक्रिय सहभाग होता.
तसेच हे दोघेही देशात आत्मघातकी हल्ले करण्याच्या तयारीत होते. जहनझैब आणि हीना हे दोघेही मूळचे श्रीनगरमधील आहेत, असे “स्पेशल सेल’चे पोलीस उपायुक्त प्रमोद सिंह कुशवाह यांनी सांगितले.
पोलिसांनी या दाम्पत्याकडून इलेक्ट्रॉनिक वस्तू आणि गुन्हेगारीशी संबंधित जिहादी साहित्य जप्त केले आहे.
हे दोघेही “सीएए’विरोधी आंदोलनामध्ये हिंसाचाराला चिथावणी देत होते, असेही कुशवाह यांनी सांगितले.
इंटरनेटवरील जिहादी लेखनामुळे जहनझैब सामीवर विशेष लक्ष ठेवण्यात येत होते.
तो आत्मघातकी हल्ले करण्याच्या मानसिकतेत असल्याचे त्याच्या कृतीतून लक्षात येत होते. त्याला अफगाणिस्तानातील “आयएसकेपी’चा वरिष्ठ सदस्याचे त्याला सहकार्य होते. तो पूर्वी खुरसनस्थित हुझैफा बाकिस्तानी याच्याही संपर्कात होता.
सामी याची पत्नी हीना ही देखील इस्लामिक स्टेट पुरस्कृत सोशल मीडीयावर सातत्याने सक्रिय असते. सोशल मीडीयावर तिचे नाव कतिजाह अल कश्मीरी/ हनबी असे आहे. सायबरविश्वातील चाणाक्ष व्यक्तींची निवड करून त्यांना सुविधा उपलब्ध करणे आणि प्रोत्साहित करण्यामध्ये ती सक्रिय असायची.
सोशल मीडीयावरून मुस्लिमांना भडकावण्याचे कारस्थान…!
भारतातील मुस्लिमांनी संघटितपणे “सीएए’ला विरोध करावा, असे आवाहन विविध सोशल मीडियावरून करत असल्याचे जहनझैबने चौकशीच्यावेळी सांगितले. “सीएए’विरोधी आंदोलनातल्या हिंसाचारासाठी बंदुक आणि स्फोटके मिळवण्याचाही तो प्रयत्न करत होता. इस्लामिक स्टेटच्यावतीने फेब्रुवारी महिन्यात प्रकाशित झालेल्या “स्वात अल हिंद’ या मॅगझीनमध्येही त्याचा सहभाग होता.
त्याचा एक सहकारी खत्ताब (अब्दुल्ला बसिथ) हा सध्या इसिसशी संबंधित खटल्यामध्ये तिहार तुरुंगात असल्याचेही सामी याने सांगितले आहे.