100 टन मुरघास “ना नफा ना तोटा’ तत्त्वावर दूध उत्पादकांना देणार
भवानीनगर -एनडीडीबीने बारामती तालुका सहकारी दूध उत्पादक संघामार्फत शारदा सह दूध उत्पादक संस्था या संस्थेस देशातील पहिला मुरघास पायलट प्रोजेक्ट काटेवाडीत दिला. या भागातील शेतकऱ्यांना जनावरांसाठी हा मुरघास अतिशय फायद्याचा असल्याचे मत या प्रोजेक्टचे सर्वेसर्वा दिग्विजय सिंह यांनी व्यक्त केले.
आज गुरुवारी (दि. 20) सकाळी या प्रकल्पाचे उद्घाटन दिग्विजय सिंग यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी बारामती तालुका दूध संघाचे अध्यक्ष संदीप जगताप, संघाचे सर्व संचालक, तसेच कार्यकारी संचालक ढोपे, शारदा सहकारी दूध संस्थेचे अध्यक्ष महादेव कचरे, सचिव जंगल वाघ, श्री छत्रपती साखर कारखान्याचे अध्यक्ष प्रशांत काटे, माई किसान मंचचे अध्यक्ष एकनाथ काटे, सरपंच विद्याधर काटे, उपसरपंच धीरज घुले, तंटामुक्त अध्यक्ष के. टी. जाधव, इंदापूर मार्केट कमिटीचे संचालक अमोल भोईटे, माजी अध्यक्ष संजय काटे, सोसायटीचे माजी अध्यक्ष अनिल काटे, प्रकाश काटे, जितेंद्र काटे, दूध संघाचे कामगार संचालक प्रकाश काटे, शीतल काटे आदी मान्यवर उपस्थित होते.
दिग्विजय सिंह म्हणाले, हा मुरघास प्रोजेक्ट उत्तमरीत्या चालून सभासदांना जनावरांसाठी चारा “ना नफा ना तोटा’ या तत्त्वानुसार देण्यात येणार असून आज 100 मेट्रिक टन मुरघास या ठिकाणी तयार केला जाणार आहे. भविष्यात 200 मेट्रिक टन मुरघास तयार करून तो दूध उत्पादकांना वितरण करण्यात येणार आहे. माजी कृषी मंत्री शरद पवार यांच्या माध्यमातून देशामध्ये पहिला प्रकल्प एनडीडीबीच्या माध्यमातून काटेवाडी या गावामध्ये राबवण्यात आला आहे. हा प्रोजेक्ट शारदा सहकारी दूध संस्थेच्या वतीने अतिशय उत्तमरित्या राबवला आहे.