शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांची भूमिका : स्वामी विवेकानंद व्याख्यानमालेत उलगडल्या आठवणी
पुणे – अयोध्येत राम मंदिर उभारणार असल्याचा प्रचंड आनंद होत आहे. याचबरोबर, राम मंदिर व्हावे ही अन्य लोकांचीही इच्छा होती, अशी स्पष्ट भूमिका पद्मविभूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी शनिवारी मांडली.
भारत विकास परिषद शिवाजीनगर शाखा आयोजित “संवाद शिवशाहिरांशी’ याअंतर्गत शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांची मुलाखत मुलाखतकार सुधीर गाडगीळ यांनी घेत स्वामी विवेकानंद व्याख्यानमालेचे 13 वे पुष्प गुंफले. मानपत्र आणि पुणेरी पगडीसह बाबासाहेब पुरंदरे यांचा सन्मान करण्यात आला. जगदीश धोंगडे, राजेंद्र जोग आदी उपस्थित होते. याप्रसंगी गाडगीळ यांनी 98 वर्षीय बाबासाहेबांचा जीवनपट उलगडला.
जाणता राजा नाटक तब्बल 12 वर्षांनी पुण्यात होणार आहे. बऱ्याच वर्षांपूर्वी जाणता राजा नाटकात वसंत शिंदे, चंद्रकांत मांढरे यासारख्या उच्च दर्जाच्या कलाकारांनी काम करण्याची इच्छा व्यक्त केली. मात्र, मी नम्रपणे नकार देत सर्वसामान्य कलाकारांचा समावेश केल्याची आठवण सांगितली. तसेच, मला कादंबरी लिहूनही कादंबरीकार व ऐतिहासिक पुस्तकांचे लिखाण करूनही इतिहासकार म्हणत नसल्याची कोटीही त्यांनी केली.
शिवसृष्टीत 11 ढाली, अडीच हजारांवर हत्यारे
पुण्यात शिवसृष्टी उभारण्याचे काम सुरू आहे. यामध्ये बाबासाहेबांनी साक्षात शिवछत्रपतींचा काळ उभा करणार असल्याचे सांगितले. ही शिवसृष्टी उभी करण्यासाठी सर्व क्षेत्रातील लोकांचे मार्गदर्शन घेतल्याचे सांगितले. तसेच, लवकरच शिवसृष्टीत 11 ढाली, 2500 हून अधिक हत्यारे, नक्षीदार तलवारी, 150 वर्षांची पैठणी, सोन्याच्या जराचा शेला ठेवणार असल्याचे सांगितले.
उत्तम प्रकृतीचा गाभा…मी निर्व्यसनी
बाबासाहेब पुरंदरे यांचा जन्म 22 जुलै 1922 सालचा. वयाच्या 98 वर्षीही मुलाखत देताना आवाज खणखणीत होता. यावेळी गाडगीळ यांनी उत्तम प्रकृतीचे रहस्य विचारताच “मी आधीही आणि आताही कधीच कुठलंही व्यसन केलं नाही, त्यामुळे प्रकृती ठणठणीत आहे,’ असे बाबासाहेब पुरंदरे म्हणाले.