शिर्डी – देशातील देवस्थानांना ऑनलाइन देणगी देताना भक्तांची होणारी फसवणूक टाळण्यासाठी प्रमुख देवस्थानांचे फेडरेशन करण्यात यावे. तसेच त्यांची देणगीसाठी एकच वेबसाइट तयार करण्यात यावी, या विषयावर तिरुपती देवस्थानच्या विश्वस्त मंडळाच्या बैठकीत चर्चा करण्यात आली. मात्र शासनाची मान्यता मिळाल्यावर त्यावर काम सुरू करण्यात येईल, अशी माहिती शिर्डी संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी कान्हूराज बगाटे यांनी दिली.
येथील श्री साईबाबा समाधी मंदिर करोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर साईभक्तांच्या दर्शनाकरीता उघडण्यासंदर्भात करावयाच्या उपाय-योजनांकरीता तिरुमला तिरुपती देवस्थान येथे शिर्डी संस्थानच्या पथकाने दौरा केला. या पथकात संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी बगाटे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र ठाकरे, प्रांताधिकारी गोविंद शिंदे, पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाकचौरे यांचा सहभाग होता.
यावेळी तिरुमला तिरुपती देवस्थानचे अध्यक्ष सुब्बारेड्डी, कार्यकारी अधिकारी अनिलकुमार सिंघल, उपकार्यकारी अधिकारी धर्मा रेड्डी व पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी बगाटे म्हणाले, श्री साईबाबांचे समाधी मंदिर दर्शनाकरीता खुले व्हावे, अशा मागणीची अनेक निवेदने संस्थानला प्राप्त झालेली आहेत. शासनाने याबाबत मंदिर खुले करण्यास परवानगी दिल्यास प्रशासनाची तत्परता असावी, म्हणून नियोजन करण्यात येत आहे. तसेच मंदिर दर्शनासाठी खुले करत असताना मंदिर प्रशासनाची यंत्रणा, सुरक्षा कर्मचारी व भक्त यांचे आरोग्य चांगले राहावे, या करीता करावयाच्या उपाययोजनांची माहिती घेण्याकरीता तिरुमला तिरुपती देवस्थान येथे भेट देवून तेथील व्यवस्थेची पाहणी करण्यात आली.
तिरुपती देवस्थान येथे ऑनलाइन पद्धतीने दर्शन दिले जात असून, दर्शनरांगेची कार्यप्रणाली, लाडूनिर्मिती, भोजन व्यवस्था, सीसीटीव्ही कॅमेरे, मंदिर आणि दर्शन रांग सफाई आदींची पाहणी पथकाने केली. यावेळी आयोजित बैठकीत देवस्थानला देणगी स्वरूपात प्राप्त झालेले सोने, चांदी व इतर देणगीबाबत, बॅंकेतील ठेवी व त्यावरील व्याज पद्धतीबाबत, गर्दीचे व्यवस्थापन, शिर्डी संस्थानच्या प्रशासनामध्ये काही बदल करणे आवश्यक आहेत का, याकरीता तिरुपती देवस्थानचे अध्यक्ष, विश्वस्त व पदाधिकाऱ्यांशी चर्चा करण्यात आली.
तसेच देवस्थानला ऑनलाइन देणगी देताना भक्तांची होणारी फसवणूक रोखण्यासाठी देशातील प्रमुख देवस्थानांचे फेडरेशन करुन, एकच वेबसाइट तयार करण्याचा प्रस्ताव देण्यात आला. याबाबत आराखडा तयार करण्यावर चर्चा करण्यात आली. ही व्यवस्था शासनच्या मान्यतेनंतर सुरू करता येईल, असेही बगाटे यांनी सांगितले.
राज्य शासनाच्या आदेशाची प्रतीक्षा
राज्य शासनाकडून श्री साई बाबा समाधी मंदिर दर्शनाकरीता उघडण्याचे आदेश प्राप्त झाल्यास तत्काळ दर्शन व्यवस्था सुरू करण्यात येईल. त्यासाठी गर्दीचे व्यवस्थापन, करोनाबाधित भक्त आढळल्यास त्यांना प्राथमिक उपचार देण्याची व्यवस्था करुन तिरुपती देवस्थानप्रमाणे उपाययोजना करता येतील, असे शिर्डी देवस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी कान्हूराज बगाटे यांनी दिली.