Rajiv Bajaj | लार्सन अँड टुब्रो (L&T) चे चेअरमन एस.एन. सुब्रह्मण्यन कर्मचाऱ्यांना आठवड्यातून 90 तास काम करण्याचा सल्ला देऊन चर्चेत आले आहेत. कर्मचाऱ्यांनी वीकेंड घरी घालवू नये असेही ते म्हणतात. त्यानंतर त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका करण्यात आली. अभिनेत्री दीपिका पदुकोन देखील त्यांच्या या विधानाचा निषेध केला. त्यानंतर आता पुन्हा एकदा वर्क-लाइफ बॅलन्सबाबत चर्चा सुरु झाली आहे. यात आता बजाज ऑटोचे एमडी राजीव बजाज देखील चर्चेत सामील झाले आहेत.
वरिष्ठ पातळीपासून सुरुवात करा
आठवड्याला ९० तासांचं वर्क कल्चर हवं असेल तर त्याची सुरुवात वरिष्ठ पातळीपासून करा, असं परखत मत राजीव बजाज यांनी मांडलं. “तुम्ही किती तासकाम करता हे महत्त्वाचं नाही, तुमच्या कामाचा दर्जा किती चांगला आहे हे महत्त्वाचं आहे. जगाला आता पूर्वीपेक्षा दयाळू आणि सौम्य स्वभावाच्या लोकांची गरज आहे. फक्त तास मोजून उपयोग नाही, तर कामाची गुणवत्ता चांगली असली पाहिजे. आजकाल लोकांना खूप काम करावे लागत आहे. लीडर्सनं आपल्या रणनीतीचा पुनर्विचार करावा”, असं बजाज म्हणाले.
पुढे बजाज म्हणाले की, “जर तुम्ही कामावर येण्या-जाण्यासाठी लागणारा वेळ समाविष्ट केला तर बहुतेक लोक दिवसाचे 12 तास काम करतात. याचा अर्थ, त्यांचा अर्धा दिवस केवळ कामातच जातो, मग ते कोणत्याही पदावर असो आणि कोणतेही काम करत असो. जर लोक अजूनही एखाद्या कामासाठी दिवसाचे 12 तास काम करत असतील तर मला वाटते की ते पुरेसे आहे.”
काय आहे प्रकरण?
इन्फोसिसचे सह-संस्थापक नारायण मूर्ती यांच्या एका वक्तव्यापासून वर्क-लाईफ बॅलन्सची चर्चा सुरू झाली होती. देशातील प्रोडक्टिव्हिटी वाढविण्यासाठी भारतातील तरुणांनी आठवड्यातून किमान ७० तास काम करावं, असं वक्तव्य त्यांनी एका कार्यक्रमात केलं. त्यानंतर कर्मचाऱ्यांनी आठवड्यातील ९० तास काम करावं आणि रविवारीही काम करण्यास संकोच करू नये, असं आवाहन लार्सन अँड टुब्रोचे चेअरमन एस. एन. सुब्रमण्यन यांनी केलं.
नेमकं काय म्हणाले एस. एन. सुब्रमण्यन ?
सुब्रमण्यन यांना एका मुलाखतीत विचारण्यात आले की त्यांची अब्जावधी डॉलर्सची कंपनी L&T अजूनही दर शनिवारी आपल्या कर्मचाऱ्यांना कामावर का बोलावते? याला उत्तर देताना ते म्हणाले की, मी रविवारी कर्मचाऱ्यांना कामावर बोलावू शकत नाही, याची मला खंत आहे. जर मी सगळ्यांना रविवारी काम करायला लावू शकलो तर मला जास्त आनंद होईल, कारण मी स्वतः रविवारी काम करतो.
एल अँड टी चेअरमन पुढे म्हणाले की, कर्मचाऱ्यांनी वीकेंड घरी घालवू नये. घरी बसून काय करता? तुम्ही तुमच्या बायकोकडे किती वेळ टक लावून बघू शकता आणि तुमची बायको तुमच्याकडे किती वेळ बघू शकते? अशाप्रकारे एसएन सुब्रमण्यन यांनी कर्मचाऱ्यांना वीकेंडलाही कार्यालयात येऊन काम करण्याचा सल्ला दिला.
हेही वाचा :
Pune : पोर्शे कार अपघात प्रकरण; रक्त नमुने बदल्याप्रकरणी आरोपीविरुद्ध न्यायालयात आरोपपत्र दाखल