मतमोजणीची तयारी पूर्ण!

मोजणी कक्ष सज्ज : निवडणूक निर्णय अधिकारी भागडे यांची माहिती

वडगाव मावळ – मावळ विधानसभेसाठी मतदानप्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आता सर्वांना निकालाचे वेध लागले आहेत. मतमोजणी गुरुवारी (दि. 24) सकाळी आठ वाजता होणार आहे. तळेगाव दाभाडे येथील नूतन महाराष्ट्र कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग ऍण्ड रिसर्चमध्ये मतमोजणी कक्ष सज्ज झाला असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा मावळ-मुळशी प्रांताधिकारी सुभाष भागडे व सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा मावळ तहसीलदार मधुसूदन बर्गे यांनी दिली.

भारत निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार सोमवारी (दि. 21) सकाळी 7 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत मावळ विधानसभा निवडणुकीचे मतदान झाले. मतदान यंत्र व व्हीव्हीपॅट सुरक्षा कक्षात सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या कक्षेत ठेवण्यात आले आहे. या सुरक्षा कक्षाला “सीआयएसएफ’चे सशस्त्र 21 जवान त्यानंतर “एसआरपीएफ’चे सशस्त्र 12 जवान तसेच मुख्य प्रवेशद्वारावर सशस्त्र 1 पोलीस अधिकारी व 3 कर्मचारी नियुक्‍त करण्यात आले आहेत.

गुरुवारी सकाळी आठ वाजता मतमोजणी करण्यासाठी 14 टेबल इव्हीएम मशीन मतमोजणी व 1 टेबल टपाली मतमोजणी असे एकूण 15 टेबलची रचना केली आहे. मावळ विधानसभेच्या 370 मतदान केंद्राच्या 370 इव्हीएम मशीन तसेच टपली मत आदी मोजणीसाठी एकूण 27 फेऱ्या होणार आहेत. साधारण दुपारी तीन वाजेपर्यंत मतमोजणी पूर्ण होणार आहे. मतमोजणी निरीक्षक केरळ राज्यातील आयएएस बी. एस. थेरोमनी यांची नियुक्‍ती करण्यात आली आहे. मतमोजणी कक्षात एका टेबलावर 1 मतमोजणी पर्यवेक्षक, 1 मतमोजणी सहाय्यक व 1 सूक्ष्म निरीक्षक असे तीन अधिकारी नियुक्‍त करण्यात
आले आहेत.

मतमोजणीसाठी 45 अधिकाऱ्यांची नियुक्‍ती
मतमोजणी कक्षात 7 उमेदवारांचे 7 मतमोजणी प्रतिनिधी एकूण 105 मतमोजणी प्रतिनिधी उपस्थित राहतील. मतमोजणीच्या दिवशी निकाल ऐकण्यासाठी ध्वनीक्षेपकाची व्यवस्था करण्यात आली आहे, असेही प्रशासनाकडून कळविण्यात आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.