अहमदाबाद – गुजरात आणि हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीची ( Assembly elections ) मतमोजणी उद्या गुरुवारी होणार आहे. गुजरातेत 182 विधानसभा जागांसाठी 37 मतमोजणी केंद्रांवर सकाळी 8 वाजता मतमोजणी सुरू होईल. गुजरातमध्ये पारंपरिकपणे भाजप आणि कॉंग्रेसमध्ये लढत होत असते पण यावेळी आम आदमी पार्टी (आप) निवडणुकीच्या रिंगणात उतरल्याने तेथील लढत तिरंगी झाली.
कॉंग्रेसपाठोपाठ भाजपलाही अस्मान दाखवण्याची ‘आप’ची कमाल
एक्झिट पोलने गुजरातमध्ये भाजपला मोठ्या बहुमताचा अंदाज वर्तवला आहे. भाजपला 117-151 जागा मिळतील, तर कॉंग्रेसला 16 ते 51 जागा मिळण्याची शक्यता एक्झिट पोलमध्ये वर्तवण्यात आली आहे. आम आदमी पक्षाला दोन ते नउ जागा मिळतील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. गुजरातमध्ये बहुमताचा आकडा 92 आहे.
गेल्या विधानसभेच्या तुलनेत गुजरातमध्ये यंदा कमी मतदान झाले आहे. 2017 च्या विधानसभा निवडणुकीत 71.28 टक्के मतदान झाले होते. तर यंदा तेथे केवळ 66.31 टक्के मतदान झाले आहे. हिमाचल प्रदेशच्या 68 जागांची मतमोजणीही आज होत आहे. या राज्यात भाजपला निसटते बहुमत मिळेल, असा अंदाज एक्झिट पोलने व्यक्त केला आहे. तथापि, एका वाहिनीने या राज्यात कॉंग्रेसला बहुमत मिळेल असा अंदाज वर्तवला आहे.