श्रीगोंदा – तालुक्यातील बाजारपेठेच्या गावात अनेकवेळा आर्थिक व्यवहारांत बनावट नोटा वापरात येत होत्या. मात्र यामागचे सूत्रधार सापडत नव्हते. श्रीगोंदा पोलिसांच्या पथकाने घोगरगाव परिसरात सापळा रचून दोन लाख 83 हजार रुपयांच्या बनावट नोटा जप्त करत एकाला ताब्यात घेतले. ताब्यात घेतलेला तरुण सोने खरेदीसाठी या नोटा घेऊन आला होता. या प्रकरणी श्रीगोंदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
श्रीगोंदा पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीमुळे जिल्हा पोलीस अधीक्षक, उपविभागीय पोलीस अधिकारी, श्रीगोंदा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक सतीश गावित यांच्या पथकाने सापळा रचला होता. एका कारमधून बनावट नोटा देऊन सोने खरेदी करण्यासाठी आलेल्या अतुल रघुनाथ आगरकर (रा. जवळेवाडी, सुपा, ता. पारनेर) या तरुणास पोलिसांनी ताब्यात घेतले.
आगरकर याच्याकडे दोन लाख 83 हजार रुपयांच्या बनावट नोटा आढळून आल्या. त्यात दोन हजार रुपयांच्या 92 व 500 रुपयांच्या 199 नोटांचा समावेश आहे. सदर नोटा त्याने माने नावाच्या व्यक्तीकडून घेतल्याचे सांगितले. आगरकर याच्या घराची झडती घेतली जात असल्याची माहिती पोलिसांनी दिली. या कारवाईत पोलीस उपनिरीक्षक माळी, पोलीस नाईक विकास वैराळ, पोलीस कर्मचारी अमोल कोतकर, अमोल शिंदे, संजय कोतकर, सायबर सेलचे राठोड यांचा समावेश होता.