कोलकता: बांगलादेशातून तस्करीमार्गे पाठवण्यात आलेले बनावट भारतीय चलन पश्चिम बंगालमध्ये जप्त करण्यात आले. ती कारवाई महसूल गुप्तचर संचालनालयाने (डीआरआय) केली.
बनावट चलनाच्या तस्करीबाबतची माहिती गुप्तचरांकडून देण्यात आली. त्याआधारे डीआरआयच्या पथकाने पश्चिम बंगालच्या दार्जिलिंग जिल्ह्यात एका ठिकाणी सापळा रचला. त्या पथकाने बसमधून उतरलेल्या एका संशयिताला ताब्यात घेतले. त्याच्याकडे 2 हजार रूपये मुल्याच्या 60 बनावट नोटा आढळल्या. त्यामुळे त्या संशयिताला अटक करण्यात आली.
तो मूळचा बिहारचा रहिवासी असल्याचे चौकशीतून स्पष्ट झाले. बांगलादेशातून त्या बनावट नोटा सीमेलगत असणाऱ्या पश्चिम बंगालच्या माल्डा जिल्ह्यात पाठवण्यात आल्या. तिथून त्या बनावट नोटा अटक करण्यात आलेल्या संशयिताकडे सोपवण्यात आल्या. त्या बनावट नोटा बिहारमध्ये एका व्यक्तीकडे सोपवण्याची जबाबदारी संशयितावर टाकण्यात आली होती.
डीआरआयच्या कारवाईमुळे बनावट नोटांच्या तस्करीमागे आंतरराष्ट्रीय रॅकेट असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. संबंधित प्रकरणाचा तपास आता विविध यंत्रणा करणार आहेत. तपासकामी विविध राज्यांच्या पोलिसांचीही मदत घेतली जाणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली.