-आरिफ शेख
अलेक्झांडर लुकाशेंको हे नाव मागील महिनाभरापासून जगभरच्या माध्यमात चर्चेत आहे. बेलारूसचे ते पाव शतकपासूनचे सर्वेसर्वा.नुकत्याच झालेल्या “निवडणुकी’त ते ऐंशी टक्के मते मिळवत सहाव्यांदा विजयी झाले. हा निकाल अमान्य करीत विरोधक रस्त्यावर उतरले आहेत.देशभर आंदोलन पेटले आहे. युरोपमधील या शेवटच्या हुकूमशहाचा “काउंट डाउन’ सुरू झाल्याचे चित्र बेलारूसमध्ये दिसत आहे.
बेलारूस हा युरोपमधील चिमुकला देश, मात्र युरोपियन युनियनशी त्याचे देणेघेणे नाही. मूळचा सोव्हिएत रशियाचा हा भाग. सोव्हिएत युनियनचे विघटन झाल्यावर हा स्वतंत्र देश म्हणून 1991 ला उदयास आला. रशिया, युक्रेन, युरोपीय युनियन, लात्वीया, ल्युथोनिया, पोलंड आदी देशांनी त्याला भौगोलिकदृष्ट्या घेरलेले आहे. 1919 मध्ये तो सोव्हिएत रशियात समाविष्ट झाला. दुसऱ्या महायुद्धात त्याने नाझीचे आक्रमण झेलले. 1986 ला झालेल्या कुप्रसिद्ध चेर्नोबिल अणुभट्टी दुर्घटनेचे चटके त्याने सोसले. 1991 ला सोव्हिएत रशियापासून विभक्त होत स्वतंत्र देश म्हणून तो रशिया व युरोपच्या मध्ये उभा ठाकला. 1994 ला झालेल्या पहिल्या निवडणुकीत अलेक्झांडर लुकाशेंको पहिले राष्ट्रपती निवडले गेले.आजवर सलगपणे ते सत्तेत आहेत. काही दिवसांपूर्वी झालेल्या निवडणुकीत त्यांनी विजयी “षटकार’ खेचला. मात्र जनतेला हा निकाल मान्य नाही.
प्रमुख प्रतिस्पर्धी उमेदवारांना त्यांनी विदेशी एजंट म्हणत तुरुंगात डांबले. काहींचे उमेदवारी अर्ज बाद ठरविले. व्हिडीओ ब्लॉगर सर्गयी त्यांचे प्रमुख प्रतिस्पर्धी. त्यांना तुरुंगात डांबल्यावर त्यांच्या पत्नी स्वेटलाना निवडणूक रिंगणात उतरल्या. जनता त्यांच्या बाजूने उभी राहिली. लोकशाहीच्या प्रतीक बनून त्यांनी बेबंदशाहीला आव्हान दिले. निकाल मात्र विरोधात गेला. निवडणूक पारदर्शी नव्हती, गैरप्रकार करून निकाल लावला गेला, भ्रष्टाचार करून लुकाशेंको सत्तेत आले आदी आरोप विरोधकांनी केले. त्यांनी पदत्याग करावा म्हणून आंदोलन सुरू झाले. त्यांना झुरळाची उपमा देत “अँटी कॉक्रोच मूव्हमेंट’ जोर धरत आहे.झुरळाच्या प्रतिमेला चपलेने मारले जात आहे. “स्लीपर मूव्हमेंट’साठी जनता चपला हाती घेऊन रस्त्यावर उतरली आहे.
तीन आठवड्यांपासून बेलारूसमध्ये ही अनागोंदी जारी आहे. आंदोलक हे विदेशी एजंट असून त्यांच्या मागे “नाटो’चे बळ आहे. युरोपला बेलारूसचे विभाजन करायचे आहे, आदी आरोप लुकाशेंको विरोधकांवर करून त्यांना तुरुंगात धाडत आहेत. हुकूमशाहीची एक खास पद्धती आहे, ती मी स्वीकारलेली आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या तमाशापेक्षा राष्ट्र एकसंध राखणारी एकाधिकारशाही केव्हाही चांगली, असे म्हणत विरोधकांना ते प्रतिआव्हान देत आहेत. अंगात बुलेटप्रूफ जॅकेट, हाती असॉल्ट रायफल अशा सैनिकी वेशात मागील काही दिवसांपासून ते वावरताना दिसतात. कधी काळी भ्रष्टाचार विरोधाचे आशास्थान ठरलेले लुकाशेंको आज भ्रष्टाचाराचे प्रतीक झाले आहेत. कधी रशियाशी जवळीक तर कधी युरोपशी मैत्री, तर कधी अमेरिकेच्या छत्रछायेत असे अनेक रंग त्यांनी 26 वर्षांत बदलले आहेत. कधीकाळी त्यांचा रशियाच्या सर्वोच्चपदावर डोळा होता.
व्लादिमीर पुतीन यांच्यामुळे तो विफल झाला. बोरिस येल्त्सिन रशियाचे प्रमुख असताना लुकाशेंको हे बेलारूसला पुन्हा रशियात समाविष्ट करू इच्छित होते. त्या आधारे येल्त्सिन यांचा उत्तराधिकारी होण्याची महत्त्वाकांक्षा त्यांनी लपविली नव्हती. पुतीन सत्तेत आल्यावर त्यांची ही मनीषा विरून गेली. 2014 ला रशियाने क्रिमियावर कब्जा केला. पुढेमागे आपला नंबर येईल या भीतीने लुकाशेंको यांनी अमेरिकेचे दार ठोठावले. नाटोने बेलारूसला दिलेल्या हमीनंतर पुतीन दोन पाऊल मागे सरले. नंतर लुकाशेंको यांनी पुतीन यांच्याशी जुळवून घेतले. तेव्हा युरोपला लुकाशेंको यांच्यात हुकूमशहा नव्याने दिसू लागला.
सध्याच्या स्थितीत युरोपीय महासंघ विरोधात तर आहेच, शिवाय एकेकाळचा मित्र रशियादेखील सोबत नाही. नाटोचे सैन्य कधीही बेलारूसवर हल्ला करण्याची भीती लुकाशेंको यांना सतावत आहे.चहूबाजूने शत्रूंनी त्यांना घेरले आहे. शिवाय देशांतर्गत जनता रस्त्यावर येऊन पायउतार करण्याचा इशारा देत आहे. बिघडलेली अर्थव्यवस्था, बेकारी, करोनाचे संकट आ वासून उभे आहेत. या साऱ्या चक्रव्यूहात हा हुकूमशहा अडकला आहे. करोनाला ते आजार मानतच नव्हते, व्होडका प्या, अन् मस्त जगा, ट्रॅक्टर चालवा, असे डोस ते देशवासीयांना देत होते.
लॉकडाऊन न करता करोनासारखा “मानसिक आजार’ आपण पळवून लावू, असे ते म्हणत. अखेर त्यांनाच करोना झाल्यावर वास्तवाचे भान आले. पाव शतकापासून त्यांनी विविध कारस्थाने करीत, राजकीय चातुर्य दाखवत अन् मित्र व शत्रूंची अदलाबदल करीत आजवर सत्ता कायम राखली. निवडणूक गैरप्रकारांसोबतच घटनाबदल करून त्यांनी सत्तेची मांड आजवर पक्की केली. या पठडीत शी जिनपिंग अन् पुतीन त्यांचे विद्यार्थी ठरावेत.
दहा दिवसांपूर्वी ते एका कारखान्यात गेले होते. तेथे कामगार जमले. ते लोकशाहीवादी घोषणा देऊ लागले. त्यांना उद्देशून लुकाशेंको म्हणाले, “तुम्ही हव्या तेवढ्या मोठ्याने “गो-गो’च्या घोषणा द्या, मला फरक पडत नाही. एक मात्र ध्यानात ठेवा, तुम्ही रेड लाइन क्रॉस केली आहे, अन् चुकीच्या माणसाशी पंगा घेतला आहे.’ देशाला एकसंध ठेवणारा, स्वच्छ प्रतिमा असणारा हा नेता पाव शतकानंतर स्वकियांसह बाह्य राष्ट्रांना देखील नकोसा झाला आहे. झुरळ म्हणत जनता त्यांच्या प्रतिमेला चपलेने मारत आहे. त्यांच्या एकाधिकारशाहीला अखेरची घरघर लागली आहे. अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्रप्रमुख जॉर्ज बुश यांनी त्यांना युरोपचा शेवटचा हुकूमशहा म्हटले होते. आता या हुकूमशाहीचा “काउंट डाउन’ सुरू झाला आहे.