मिफ 2020 साठीची उलटगणती सुरु

भारत आणि जगभरातील चित्रपटरसिक ज्याची आतुरतेने वात बघत असतात, असा 16 वा मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (माहितीपट, लघुपट आणि ॲनिमेशनपट) 2020 चे उद्‌घाटन येत्या 28 जानेवारी 2020 रोजी वरळीतील नेहरु सेंटर सभागृहात संध्याकाळी 5 वाजता होणार आहे. सात दिवस चालणाऱ्या या महोत्सवाची सांगता आणि पुरस्कार वितरण समारंभ देखील त्याच सभागृहात 3 फेब्रुवारी 2020 रोजी संध्याकाळी 5 वाजता होईल. बिगर-चित्रपट श्रेणीतल्या सर्व लघु आणि माहितीपटांसाठी समर्पित अशा या दक्षिण आशियातील सर्वात जुन्या चित्रपट महोत्सवादरम्यान म्हणजेच 29 जानेवारी ते 2 फेब्रुवारी या काळात चित्रपटांचे शो आणि इतर संबंधित कार्यक्रम डॉ गणपतराव देशमुख मार्गावरच्या चित्रपट प्रभागच्या (फिल्म्स डिव्हिजन) परिसरात होणार आहेत.

फिल्म्स डिव्हिजनच्या महासंचालक आणि मिफ्फ-2020 च्या संचालक स्मिता वत्स शर्मा यांनी आज पत्रकार परिषदेत या महोत्सवाविषयी माहिती दिली.

सोळावा मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव मिफ्फ 2020 अनेक अर्थाने वैशिष्टपूर्ण ठरणार आहे. स्पर्धा विभागातल्या विविध विषयांवरील चित्रपटांच्या प्रदर्शनासह, माहितीपट आणि ॲनिमेशन क्षेत्रात विशेष उल्लेखनीय कार्य केलेल्या ज्येष्ठ दिवंगत दिग्गजांच्या सन्मानार्थ त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी त्यांच्या चित्रपटाचे विशेष शो आणि प्रदर्शन आयोजित केले जाणार आहे. “रेट्रोस्पेक्टीव्ह पॅकेजेस’ या विभागात अॅनिमेशनपटांच्या चाहत्यांना तीन देशातील जुन्या निवडक ॲनिमेशनपटांचा आनंद घेता येणार आहे. तसेच, आणखी एका विशेष पॅकेजमधून युरोपीय माहितीपटांची संस्कृती उलगडली जाणार आहे. सोळाव्या मिफ्फसाठी जगभरातून येणारे प्रतिनिधी या विषयातील वैविध्यपूर्ण अनुभव आणि समकालीन चित्रपटांची पुरेपूर जाण असणारे आहेत.

मिफ्फ हा जगभरातील माहितीपट आणि लघुपट निर्मात्यांना आकर्षित करणारा महोत्सव आहे. यंदाही या महोत्सवासाठी आलेल्या प्रवेशिकांची संख्या पाहिली असता, या महोत्सवाला मिळालेली लोकप्रियता आणि विश्वासार्हता याचा अंदाज येऊ शकेल. या महोत्सवासाठी यंदा राष्ट्रीय स्तरावर विक्रमी 729 चित्रपट तर आंतरराष्ट्रीय स्तरावर 24 देशांतून 144 चित्रपट प्रवेशिका आल्या आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.