fbpx

आधी पैसे मोजा, मग परीक्षा

शाळांचा अजब कारभार : शिक्षण विभागाचे दुर्लक्ष

पिंपरी – शाळा कधी सुरू होणार याबाबत अद्याप शाश्‍वती नाही. करोना संक्रमणाचा धोका लक्षात घेता यंदा सर्व शाळांमधील विद्यार्थी ऑनलाइन अभ्यास करत आहेत. मात्र शहरातील खासगी व महापालिकेच्या शाळांनी विद्यार्थ्यांच्या ऑनलाइन परीक्षा घेण्यास सुरुवात केली आहे. मात्र यामध्ये खासगी शाळांनी परीक्षांना शुल्क वसुलीचे साधन बनविल्याचे अनेक ठिकाणी दिसून येत आहे. आधी पैसे मोजा मग परीक्षा द्या, अशी अट काही शाळा प्रशासनाने घातली आहे.

करोना संसर्गानंतर सर्वच क्षेत्रे आता कुठे पर्वपदावर येत आहेत. सर्वसामान्य कुटुंबांचा जगण्याचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. अशा परिस्थितीत आपल्या पाल्याच्या शिक्षणाची काळजी वाटणे स्वाभाविक आहे. याचाच फायदा घेत शाळांकडून थकलेली फी वसूल करण्यासाठी परीक्षांना मोठे साधन बनविले आहे.

विद्यार्थ्यांना परीक्षा द्यायची असेल तर पहिल्यांदा त्यांची फी भरा असा तगादा शाळांनी लावलेला आहे.
महापालिकेच्या शिक्षण विभागाने याबाबत शाळांना वारंवार सूचित केले आही की फी भरण्याबाबत पालकांना तगादा लावू नये. मात्र, शिक्षण विभागाच्या सर्वच सूचनांकडे खासगी शाळा प्रशासन दुर्लक्ष करत आहे.

पालकांना फोन करून शाळेत परीक्षा द्यायची असेल तर पहिल्यांदा फी भरा असा आग्रह केला जात आहे. सध्या सर्वांचेच उत्पन्न घटले आहे, तर काहींचे रोजगारही गेले आहेत. शाळा बंदही आहेत, यामुळे शाळांनी शुल्क कमी करावे, अशी पालकांची मागणी होती, परंतु शाळा व्यवस्थापनास पूर्ण शुल्क हवे आहे.

सामान्य पालकांची परवड
दरवर्षी या शैक्षणिक संस्था मोठ्या प्रमाणावर शुल्क आकारत असतात. पाल्याला चांगले शिक्षण मिळावे यासाठी पालक त्यांना खासगी संस्थेत प्रवेश घेऊन देतात. यावर्षी मात्र अनेकांचे रोजगार गेले आहेत. व्यवसाय बंद झाले आहेत. त्यामुळे एवढे शुल्क भरणे पालकांना शक्‍य नाही. असे असतानाही फीसाठी संस्थाकडून तगादा लावण्यात येत आहे. या शाळांचे शुल्क सामान्यांना परवडणारे नाही. मात्र तरीही मुलाच्या भविष्यासाठी पालक उसनवारी करून शुल्क भरत आहेत.

एकावरही कारवाई नाही
शहरातील 19 शाळांबाबत पालकांनी पहिल्यांदाच फी साठी तगादा लावत असल्याबाबत तक्रारी दिल्या होत्या. मात्र शिक्षण विभागाने आजपर्यंत एकाही शाळेवर ठोस कारवाई केली नाही. ज्या शाळांमध्ये वह्या पुस्तके सापडली त्या शाळांच्या वर्गखोल्या सील करण्यात आल्या. मात्र पुढे त्यांच्यावर काहीच कारवाई झाली नाही.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.