समुपदेशन : रागामागील कारणे समजून घ्या…

वैदेहीची आई आत येऊन बसली. आल्यापासूनच त्या जरा धास्तावलेल्या वाटत होत्या. तिचे वडीलही आईबरोबर येऊन बसले. त्यांना येण्यामागील कारण विचारल्यावर इतका वेळ शांत बसलेल्या आईच्या डोळ्यात पाणी आलं. वडीलही थोडे गंभीर झाले. त्यांनी प्रथम स्वतःची ओळख करून दिली.

“”मी वैदेहीचा बाबा. वैदेही आमची एकुलती एक मुलगी. सध्या 9वी मध्ये शिकते. ही तिची आई. आमची वैदेही तशी खूप शहाणी आणि समजुतदार आहे. मी एका शाळेत शिपायाचे काम करतो आणि तिची आई शिवणकाम करते. वैदेही आमची खूप लाडकी आहे. या आधी काही ना काही कारणाने आमची तीन मुले काळाने हिरावून नेली आहेत. त्यामुळे वैदेहीला आम्ही तळहातावरच्या फोडाप्रमाणे जपली आहे. आतापर्यंत तिचे सर्व हट्ट पुरवले आहेत. वैदेहीला कौटुंबिक आर्थिक परिस्थितीची चांगली जाणीव आहे. त्यामुळे तिने कधीही वाजवी हट्ट केलेले नाहीत, पण सध्या मात्र. एवढं बोलून काका थांबले. रडणाऱ्या काकूंना त्यांनी शांत केलं.

आता मात्र काकूंनी बोलायला सुरुवात केली. “”सध्या मात्र ती खूप विचित्र वागतीये. तिच्यातला तो साधेपणा, समजूतदारपणा कुठे गेलाय कोणास ठावूक! आम्हाला दोघांना वाट्टेल तशी बोलते. उलट उत्तरं देते. परवा तिने राग आला म्हणून रिमोट टी.व्ही. वरच फेकून मारला. टीव्ही फुटता फुटता वाचला. परवा मी कामासाठी बाहेर गेले होते तेव्हा तिच्यासोबत बाबा थांबले होते. तिने त्यांच्याकडे गेम खेळण्यासाठी मोबाईल मागितला. त्यांनी नकार दिला तर तिने त्यांची कॉलरच पकडली आणि खिशातून स्वतः मोबाईल काढून घेतला.

हे पाहिल्यावर तिचे बाबा खूपच घाबरले. त्यांनी हे सर्व मला सांगितल्यावर मी तिला समजावण्याचा प्रयत्न केला तर मला म्हणाली, “मी उगीच तुमच्यासारख्या गरीब पालकांच्या घरात जन्माला आले. माझ्यासारख्या इतक्‍या सुंदर मुलीला एखादं श्रीमंत घर हवं होतं. फार बरं झालं असतं. तुमच्यासारखं राहावं लागलं नसतं. मला हे घर अजिबात आवडत नाही आणि तुम्हीही आवडत नाही…’ आम्ही किती मेहनत करतो. तिच्या इच्छा कशा पूर्ण करतो यावर तिच्याशी बोलले तर म्हणते, “त्यात काय हे तर सगळेच आई वडील करतात.

तुम्ही माझ्यासाठी हे केलंच पाहिजे. त्यात काय मोठं कौतुक आहे.” हे सांगताना काकूंच्या डोळ्यात परत पाणी आलं. “”बोलणं तर तिचं असं विचित्र झालंच आहे पण वागणंही खूप बदललंय. सतत आरशासमोर असते. स्वतःचंच कौतुक करत बसते. वेगवेगळ्या केसाच्या स्टाईल करते आणि तिला काही समजावयाला गेलं की तिला भयंकर राग येतो. अगदी लाल लाल होते. वस्तू फेकते. आम्हाला मारते. धमक्‍या देते. काय करावं कळेना झालंय. आम्ही काय करू?”

हे सारं ऐकल्यावर तिच्या वयात येण्यामुळे तिच्यात हे बदल होतायत, हे लक्षात आलं. त्यांची सविस्तर चर्चाही तिच्या पालकांशी पुढील 1-2 सत्रात केली. त्यानंतर वैदेहीला सत्रासाठी पाठवण्यास सांगितले. वैदेही सत्रास आली खरी सत्रात बोलली देखील, पण तिच्या बोलण्यातून आणि देहबोलीतून हे स्पष्ट कळत होते की तिला काहीच ऐकून घ्यायचे नव्हते. तिच्या बोलण्यातून सतत राग आणि विरोध दिसतच होता. तिला ती वागत असलेली कोणतीच गोष्ट चुकीची आहे, असं वाटत नव्हतं. तो तिचा रागच तिच्या समजूतदार, शांत स्वभावाच्या आड येत होता.

तिच्या पालकांशी बोलल्यावर असे लक्षात आले की, तिचे आजोबा आणि दोन्ही काका असेच तापट आहेत. म्हणजेच वयात आल्यानंतर तिच्यात दिसू लागणारा हा राग बराचसा अनुवंशिक होता. त्यामुळे तिचा राग ताब्यात ठेवण्यासाठी किंवा त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी तिला काही औषधे देणे आवश्‍यकच होते. आई-वडिलांच्या सहकार्याने तिला ही औषधं देऊन तिचा राग कमी केला व त्यानंतर तिची समुपदेशनाची सत्रं घेण्यात आली.

या समुपदेशन सत्रात तिला वयात येणे या संकल्पनेची शास्त्रीय माहिती देण्यात आली. म्हणजेच वयात येणे म्हणजे नक्की काय, या वयात कोणते शारीरिक, मानसिक, भावनिक, वार्तनिक बदल होतात. तिला येणारा हा टोकाचा राग, त्यातून तिच्याकडून दिल्या जाणाऱ्या प्रतिक्रिया, त्याचे होणारे परिणाम, पुढे जाऊन याच रागामुळे होऊ शकणारे गंभीर परिणाम, या सर्वांवर कसे नियंत्रण मिळवावे.

या बदलांना कसे सामोरे जावे, सामोरे जाताना काय काय प्रयत्न करावेत या सर्व छोट्या छोट्या पण अतिशय महत्त्वाच्या मुद्यांवर तिला सखोल मार्गदर्शन करून स्वतःमध्ये बदल करण्यासाठी प्रोत्साहित केले. सुरुवातीला तिने या साऱ्याला फारसा प्रतिसाद दिला नाही, पण नंतर मात्र औषध आणि समुपदेशन या दोन्हीमुळे तिच्यात हळूहळू बदल घडत गेले आणि ती पहिल्यासारखी शांत व समजूतदार झाली. आपला राग आपलं किती नुकसान करतोय हे तिचं तिलाच आपोआप समजलं.

मानसी तांबे- चांदोरीकर

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.