बेरोजगारीला कंटाळून आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्याचे समुपदेशन
पुणे – जगणे इतके कठीण वाटू लागले की, त्यापुढे मरण स्वस्त वाटू लागल्याची भावना निर्माण होऊन आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या एका तरुणाला अन्य तरुणांनी समजूत काढून परावृत्त केले. भर वस्तीत लाल महालाजवळ जिजामाता चौकात हा प्रकार घडला.
एक तरुण बेरोजगारीला कंटाळून आणि पोटातील भुकेचा दाह सहन न झाल्याने वाहनाखाली जीव देण्यासाठी रस्त्याच्या मध्यभागी झोपला. तेथे, आजुबाजूला असलेली काही तरुण मुले तेथे उभी होती. त्याची ती कृती पाहून त्यांनी त्याला बाजूला घेण्याचा प्रयत्न केला. त्या फुटपाथवर आणून बसवले. त्याच्या या कृतीचे कारण विचारल्यानंतर त्याला रडू आवरेना. हा तरुण मूळचा कोल्हापूरचा असून, आईसह पुण्यात रस्त्यावर राहतो मिळेल ते काम करून तो उदरनिर्वाह करतो. लॉकडाऊनमुळे त्याला रोजगार मिळेना. त्यामुळे अन्नपाण्याची सोयही करता येईना. इतके दिवस स्वयंसेवी संस्थांनी, महापालिकेने दिलेल्या अन्नदानावर त्याची गुजराण झाली. मात्र, ही “समाज सेवा’ बंद झाल्याने आणि हाताला काम नसल्याने त्याची अक्षरश: दैना झाली.
पोटातील भूकेचा आगडोंब सहन न झाल्याने त्याने आत्महत्येचा निर्णय घेतला. आणि तो चक्क रस्त्यावर झोपला. आजुबाजुच्या तरुणांनी त्याला त्यापासून परावृत्त केले. फरासखानातील बीटमार्शल तेथे आले. तोपर्यंत जमलेल्या तरुणांनी त्याला खायला दिले. भुकेने व्याकूळ झाल्याने त्याने दिलेले अन्न काही मिनिटांत संपवले. परंतु, मला नोकरी द्या, अशी विनवणी त्याने पोलिसांना केली. तात्पुरते अन्न दिले. परंतु, नोकरीची मागणी कशी पूर्ण करावी, असा प्रश्न मात्र पोलिसांनाही पडला आहे.