कट्ट्यावरही फुलवले कमळ

करदात्यांच्या पैशातील “संकल्पने’ला राजकीय रंग देण्याचा नगरसेवकांकडून प्रकार

पुणे – “संकल्पना’ या नावाखाली महापालिकेच्या विकास निधीतून अर्थातच करदात्यांच्या पैशातून साकारलेल्या विविध प्रकल्पांना सर्रासपणे राजकीय पक्षांच्या झेंड्याचा रंग देण्याचा प्रकार नगरसेवकांनी सुरू केला आहे. वाचनालये झाली आता थेट नागरिक कट्ट्यावर कमळ फुलवण्याचा प्रकार सुरू झाला असून, त्यालाही “संकल्पना’ या नावाखाली स्वत:चे नाव दिले गेले आहे.

महापालिकेच्या वतीने शहराच्या विविध रस्त्यांवर दिशादर्शक कमानी, रस्त्यांची नावे, चौक, पुतळे, सार्वजनिक शौचालये, उद्याने, ऐतिहासिक वास्तू, नाट्यगृहे, सभागृह, लोकप्रतिनिधींच्या निवासस्थानाकडे, जनसंपर्क कार्यालयाकडे जाण्यासाठी लावण्यात येणारे दिशादर्शक, निवास्थाने आदी ठिकाणी नावांसह पाट्या लावल्या जातात. एवढेच नव्हे तर चार सदस्यीय प्रभाग रचनेमुळे एकाच नावाच्या चार-पाच पाट्या एकाच ठिकाणी दिसतात.

सरकारी किंवा महापालिकेच्या, नागरिकांच्या कररूपातील पैशातून उभारलेल्या कोणत्याही वस्तूवर राजकीय पक्षांचे अस्तित्त्व असता कामा नये, असा नियम असताना नगरसेवकांकडून नाम फलकांना पक्षाच्या झेंड्यांचे रंग देऊन खुलेआम प्रचार केला जात आहे.

यामध्ये सत्ताधारी भाजपचे नगरसेवक आघाडीवर आहेत. शिवसेनेच्या नगरसेवकांनीही फलकांना भगवे रंग दिले गेले आहेत. याशिवाय या कट्ट्यांवर नगरसेवक नसलेले परंतु”लोकल’ नेत्यांची नावे संकल्पना म्हणून वापरले आहेत.

पाट्यांच्या धोरणाची घोषणा हवेतच…
बेकायदेशीर फ्लेक्‍सबाजीमुळे शहराचे विद्रुपीकरण होत असताना नगरसेवकांकडून नामफलकांना आणि विविध वास्तूंना राजकीय पक्षांच्या झेंड्यांचे रंग देऊन त्यात भर टाकली जात आहे. या संदर्भात महापालिकेचे कोणतेही धोरण तयार नसल्याने नगरसेवकांकडून हे प्रकार केला जात आहे. या पार्श्‍वभूमीवर काही महिन्यांपूर्वी तत्कालीन महापौर, सभागृहनेते आणि अतिरिक्त आयुक्त यांनी यासंबंधी धोरण करण्याची घोषणा केली होती. मात्र, ही घोषणा प्रत्यक्षात वल्गनाच ठरली आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.