प्रदेशाध्यक्ष थोरात यांना आमदार थोपटे यांच्या मंत्रिपदाबाबत सवाल
भोर – भोर, वेल्हा, मुळशी मतदारसंघातून सलग तीन वेळा निवडून आलेले आमदार संग्राम थोपटे यांना कॉंग्रेस पक्षाने मंत्रिमंडळात स्थान दिले नाही. याबाबत मतदारसंघातील पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्या संतापाचे वातावरण कायम असून याचे पडसाद सर्वत्र उमटू लागले आहेत. यातूनच भोर नगरपालिकेचे नगराध्यक्ष तसेच सर्व पदाधिकाऱ्यांनी कॉंग्रेस पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा कॉंग्रेसचे पक्षाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्याकडे दिले. यातून भोरमधील राजकारणात खदखद वाढली असून कॉंग्रेसचे पदाधिकारी आणखी आक्रमक होण्याच्या
तयारीत आहेत.
राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी आणि कॉंग्रेस पक्षाचे मिळून सरकार स्थापन झाल्यानंतर मंत्रिमंडळात भोरला स्थान दिले जाणार असल्याचे सांगितले जात होते. याबाबत कॉंग्रेसकडून तयार करण्यात आलेल्या यादीत आमदार संग्राम थोपटे यांच्या नावाचाही समावेश असल्याचे प्रदेशाध्यक्ष थोरात यांनी सांगितले होते. परंतु, ऐनवेळी आमदार थोपटे यांचे नाव वगळण्यात आले.
मंत्रिपदासाठी आवश्यक असलेली पात्रता ज्यांच्याकडे नाही, अशांनाही मंत्रिपदाची शपथ दिली गेल्यानंतर कॉंग्रेसमधील अनेकांनी भुवया उंचावल्या. याचेच पडसाद भोर मतदारसंघात तीव्र स्वरूपात उमटले. पुणे शहरातील कॉंग्रेस भवनापर्यंत संतापाची लाट उसळली होती. त्यावेळी प्रदेशाध्यक्ष थोरात यांनी याची दखल घेत आमदार संग्राम थोपटे यांचा योग्य सन्मान केला जाईल, असे आश्वासन दिले होते. त्यानंतर कॉंग्रेसचे भोरमधील ज्येष्ठ नेते माजी मंत्री अनंतराव थोपटे यांच्या आवाहनानुसार पदाधिकारी, कार्यकर्ते शांत झाले होते.
दरम्यान, भोरमधील पदाधिकारी, नगरसेकांनी सामूहिक राजीनामे देण्याचा इशारा यापूर्वीच देवूनही याकडे दुर्लक्ष केले जात असल्याने सोमवारी (दि.6) मुंबई येथे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या कार्यालयात भोर नगरपालिकेच्या नगराध्यक्ष निर्मला आवारे, उपनगराध्यक्ष गणेश पवार, गटनेते सचिन हर्णसकर यांच्यासह 20 नगरसेवकांनी आपले राजीनामे दिले आहेत.
भोर नगरपालिकेत कॉंग्रेसची एकहाती सत्ता असून 17 नगरसेवक आणि एक नगराध्यक्ष तसेच दोन स्वीकृत नगरसेवक आहेत. विशेष म्हणजे या सर्वांनीच आपल्या पदाचे राजीनामे दिले आहेत. भोर मतदारसंघातील कॉंग्रेस कमिटीच्या अनेक पदाधिकाऱ्यांनीही प्रदेशाध्यक्षांकडे राजीनामे पाठविले असून सर्व समित्या बरखास्त केल्याचे जाहीर केले आहे.
गांधी आणि थोपटे यांची चर्चा…
राज्याच्या मंत्रिमंडळात आमदार संग्राम थोपटे यांना स्थान देता आले नसल्याने त्यांचा योग्य सन्मान केला जाईल, असे प्रदेशाध्यक्ष बाळासोहब थोरात सांगत असून याबाबत पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांच्याशी आमदार थोपटे यांची थेट भेट होणार आहे. या बैठकीनंतर थोपटे यांच्याबाबत लवकरच सकारात्मक निर्णय घेतला जाईल, असेही थोरात यांच्याकडून सांगितले जात आहे.