पुणे – गेल्या काही वर्षांत सातारा रस्त्यावर करण्यात आलेल्या कोट्यवधींच्या खर्चानंतरही या रस्त्याचे काम चुकीच्या पद्धतीने झाल्याचा दावा करत सत्ताधारी भाजपसह सर्व पक्षीय नगरसेवकांनी मुख्यसभेत आंदोलने केली, तसेच या मार्गावरील खर्चाची चौकशी करून त्याचे सेफ्टी ऑडीट करण्याची मागणी केली. मात्र, त्याचा प्रस्ताव स्थायी समितीत येताच, सर्वपक्षीय सदस्यांनी गप्प राहणेच पसंत केल्याने ऑडीटचा प्रस्ताव पुढे ढकलण्यात आला आहे. त्यामुळे हे आंदोलन केवळ नाटक होते का, खरचं या सदस्यांना नागरिकाची सुरक्षा हवी आहे, याबाबत शंका उपस्थित केल्या जात आहेत.
पुणे-सातारा रस्त्यावरील स्वारगेट चौक ते कात्रज चौकापर्यंत बीआरटी मार्गात सुधारणा, फूटपाथ, सायकल ट्रॅक अशा कामांसाठी 2008 पासून तब्बल 204 कोटी रुपयांचा खर्च केला आहे. मात्र, त्यानंतरही बीआरटीच्या अडथळ्यांची शर्यत संपलेली नाही. असे असताना, पुन्हा याच कामासाठी प्रशासनाकडून 2017 मध्ये नव्याने स्मार्ट स्ट्रीट अंतर्गत सुधारणा करण्यासाठी 79 कोटींची निविदा काढली आहे.
मात्र, हे काम करताना अनेक ठिकाणी बीआरटी बस जाण्यासाठी अवघ्या 3 ते साडेतीन फूट रस्ता असल्याने त्यातून बसऐवजी केवळ दुचाकीच जात आहे. त्यामुळे या कामाबाबत सर्वपक्षीय नगरसेवकांनी महापालिकेच्या कारभारावर टीका करत तातडीने मार्गासाठी केलेल्या खर्चाची तपासणी तसेच रस्त्याची सुरक्षा तपासण्यासाठी सेफ्टी ऑडीट करण्याची मागणी स्थायी समिती, मुख्यसभेत केली होती.