देहुरोड – दोन महिन्यांपूर्वी झालेल्या गोळीबारातून बचावलेले देहुरोड कॅंटोन्मेंट बोर्डाचे भाजपाचे नगरसेवक विशाल खंडेलवाल यांच्यावरील हल्ला प्रकरणातील तीन हल्लेखोरांवर “मोक्का’ अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. साबीर समीर शेख (वय 19, रा. वराळे फाटा, श्री हॉस्पीटल मागे, तळेगाव स्टेशन) आणि साईतेजा ऊर्फ जॉनी शिवा चिंतामल्ला (वय 19, रा. देहुरोड) असे मोक्कांतर्गत कारवाई झालेल्या हल्लेखोरांची नावे आहेत.
सहायक पोलीस आयुक्त संजय नाईक पाटील यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार साबीर शेख याच्या भावाने केलेल्या तोडफोड प्रकरणी नगरसेवक खंडेलवाल यांनी पुढाकार घेऊन बाजारपेठ बंद ठेवली होती. या घटनेचा राग धरून दोन महिन्यांपूर्वी सायंकाळी देहुरोड येथील नेहरू मंगल कार्यालयाजवळील खंडेलवाल यांच्या संपर्क कार्यालयासमोर सायंकाळी साडेसातच्या सुमारास खंडेलवाल गप्पा मारत होते. त्यावेळी त्यांच्यावर हल्लेखोरांनी गोळीबार केला होता.
या गोळीबार हल्ल्यातून ते बालबाल बचावले होते. घटनेनंतर पोलिसांनी हल्लेखोरांचा तपास करीत दोघांना अटक केली होती. त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेले पिस्तूल जप्त करण्यात आले होते. या प्रकरणातील आफताब शेख अद्याप फरार असून, देहूरोड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मनीष कल्याणकर यांनी हल्लेखोरांवर मोक्कांतर्गत कारवाईचा प्रस्ताव वरिष्ठ अधिकारी यांच्याकडे पाठवला होता.
या प्रकरणी अप्पर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे यांनी तिघा हल्लेखोरांवर कारवाई करण्याची आदेश दिले होते. या प्रकरणी सहाय्यक पोलीस आयुक्त नाईक पाटील तपास करीत आहेत.
दरम्यान, डिसेंबर महिन्यामध्ये पुणे पोलीस आयुक्तालयाकडे साबीर शेख आणि साईतेजा यांच्यावर मोक्कांर्गत कारवाईचा प्रस्ताव सादर केला होता. वेळेत कार्यवाही न झाल्याने हा प्रस्ताव फेटाळण्यात आला होता. त्यानंतर आरोपींनी देहुरोडमध्ये गोळीबार केला.