नगरसेवक खंदारे, हे जरा अति झालं!

शिवेंद्रराजेंनी कानपिचक्‍या देण्याची गरज

लोककल्याणाची हाकाटी बाळू खंदारे यांनी कितीही पिटली आणि दोन्ही नेत्यांच्या
पाठिंब्यांचा दावा केला तरी असभ्य वर्तनाचा त्याचा कांगावा समर्थनीय नाही. खंदारे यांनी तारतम्य राखून संयमाने कामाचा पाठपुरावा करण्यात आपली उर्जा वापरावी, असा सल्ला नगर विकास आघाडीच्या ज्येष्ठ नगरसेवकांनी दिला आहे. आमदार शिवेंद्रराजे यांनी अशा अतिउत्साही व आक्रस्ताळी नगरसेवकांना तातडीने कानपिचक्‍या देणे अपेक्षित आहे.

सातारा  – लोकांच्या हक्कासाठी होणाऱ्या आंदोलनात प्रशासनाला धारेवर धरण्याचे सनदशीर मार्ग आहेत. नगर विकास आघाडीचे नगरसेवक बाळू खंदारे यांचा पॅंट उतरवण्याचा स्टंट म्हणजे “हे जरा अति झालं,’ अस म्हणण्याची वेळ आली आहे. सातारा पालिकेच्या इतिहासात असे आक्रस्ताळे व असभ्य वर्तन कधी झाले नव्हते. त्यामुळे “खंदारे यांना आवरा,’ असे नगर विकास आघाडीला सांगण्याची वेळ आली आहे. पालिका प्रशासनानेही फौजदारी कारवाईच्या नावाने शेपूट घातल्याने सरकारी बाबूंचा बुळगेपणा उघड झाला आहे.

खासगी सावकारी अन्‌ मारामारीचे विविध गुन्हे दाखल असलेले नगर विकास आघाडीचे नगरसेवक बाळू खंदारे व त्याची राजकीय कारकिर्द सातत्याने वादग्रस्त राहिली आहे. सुरूची राडा प्रकरण अथवा खंड्या धाराशिवकर प्रकरणात खंडणी मागितल्याने लागलेला मोका यामुळे खंदारे यांच्या नगरसेवकपदाच्या कालावधीत “खाकी’पासून तोंड लपवण्यातच त्यांचा जास्त वेळ गेला आहे. वादग्रस्त बाळासाहेब उर्फ विनोद त्यांच्या सात क्रमांक प्रभागात भयंकर फार्मात आहेत. किंबहुना पेठेतील राजकीय समीकरणे खंदारे यांच्या बाजूने असल्याचे सांगितले जाते.

उसळत्या रक्‍ताचा धसमुसळेपणा टोकाला जात असल्याने खंदारे यांचे कथित लोककल्याणाचे राजकीय स्टंट पालिकेलाच नव्हे तर आमदार गटालाही अडचणीचे ठरत आहेत. पालिकेच्या अधिकाऱ्याला गाठून दम देणे,बघून घेतो या सिग्नेचर शब्द वापरणे, सभागृहात आरडाओरडा करणे, नगराध्यक्षांना न जुमानणे या वादग्रस्त पध्दतीमुळे विनोद खंदारे या सदस्यांना थांबवा, अशी कर्मचाऱ्यांची मानसिकता झाली आहे. जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीतही माजी पालकमंत्री विजय शिवतारे यांनाही खंदारे यांनी ग्राम्य शैलीचा जोरदार झटका दिला होता. बाळू खंदारे यांच्या आंदोलनाची मुख्याधिकारी शंकर गोरे यांनी इतकी दहशत घेतली की त्यांनी स्वतःला काही काळ घरातच कुलूपबंद करून घेतले होते. किंबहुना गोरे यांच्याविरोधात तीस तक्रारी दाखल झाल्याचा गौप्यस्फोटही खंदारे यांनीच केला होता. मात्र, शुक्रवारी उपमुख्याधिकाऱ्यांच्या दालनात खंदारे याने पॅंट उतरवण्याचा केलेला प्रकार अशोभनीय ठरला. या प्रकारामुळे अधिकारी व पदाधिकारी यांच्यातील दरी वाढली आहे.

दरम्यान, बाळू खंदारे अल्पवयीन असल्यापासून त्यांच्यावर मारामारी, दहशत माजविण्याचे गुन्हे दाखल होते. ज्या दिवशी त्याला अठरा वर्षे पूर्ण झाली. त्याच्या दुसऱ्या दिवशी त्याच्यावर मारामारीचा गुन्हा दाखल झाल्याचे पोलीस सांगतात. त्यावेळचा एक किस्सा पोलिसांच्या अद्यापही स्मरणात आहे. रविवार पेठेमध्ये दोन गटांत मारामारी झाली होती. त्यावेळी मोठ्या प्रमाणात दहशत माजविण्यात आली होती. त्यावेळचे शहर पोलीस ठाण्याचे तत्कालीन पोलीस निरीक्षक रामदास शिंदे यांनी बाळू खंदारे यांना भररस्त्यातून बदडतच पोलीस ठाण्यात आणले होते.
ते राजकारणात सक्रिय झाले. आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या नगर विकास आघाडीकडून पहिल्याच प्रयत्नात ते नगरसेवक म्हणून पालिकेत निवडून आल. तीन ते चार सभांना ते पालिकेत हजर राहिले, अन्यथा इतर सर्व दिवस त्याचे पोलिसांपासून लपण्यातच गेले.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)