खासगी रुग्णालयांना वाढीव बिलांचा ‘संसर्ग’
करोनाबाधितांवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांचाच गौप्यस्फोट
– महादेव जाधव
कोंढवा – करोना बाधितांच्या उपचारांवर खासगी रुग्णालयांत मनमानी बिल आकरणीचा प्रकार सुरूच आहे. दिवसाला दोन वेळा तपासणीसाठी दोन स्वतंत्र पीपीई किटचा वापर, एक किट 700 ते 1000 रुपये, असा 10 ते 14 दिवसांचा खर्च रुग्णांकडून वसूल केला जात आहे. सदर प्रकार खासगी रुग्णालयात करोना बाधितांवर उपचार करणाऱ्या एका डॉक्टरांनीच उघड केला आहे.
प्रकरण नेमके काय?
नाव प्रकाशित न करण्याच्या अटीवर एका डॉक्टरांनी सांगितले की, “करोनाबाधितांवर उपचाराचे दर शासनाने ठरवून दिलेले असले तरी खासगी रुग्णालयांनी रुग्णांकडून पैसे उकळण्यासाठी “पीपीई किट’चा आधार घेतला आहे. एक पीपीई किट साधारण 700 ते 1000 रुपयांना खरेदी केले जाते. तर, काही ठिकाणी 2000 रुपयांचे पीपीई किट वापरले जात आहे. डॉक्टरांकडून दिवसाला दोन वेळा व्हिजिट होते. त्यामुळे दोन वेळा नवे किट वापरले जाते आणि त्याचे बिल वसूल केले जाते.
मास्क-ग्लोव्हजसोबतच, पण तरीही पैसे
डॉक्टर आल्यानंतर ते किमान 20 रुग्णांची तपासणी करतात. अशावेळी पीपीई किटचा खर्च 20 रुग्णांकडून वसूल करणे अपेक्षित असताना हा खर्च प्रत्येक रुग्णाकडून वसूल केला जात आहे. प्रत्येक रुग्णाच्या बिलामध्ये पीपीईचा खर्च वेगवेगळ्या रकमा टाकून नमूद केला जात आहे. विशेष म्हणजे, पीपीई किटसोबत मास्क तसेच हॅन्डग्लोव्हज् मिळत असताना याचा खर्चही वेगळा आकारला जात असून, यासाठी किमान 500 रुपये खर्च बिलात घुसवला जात आहे, ही बाब गंभीर असल्याची खंत संबंधित डॉक्टरांनी व्यक्त केली आहे.
खासगी रुग्णालयांचे प्रशासनासही नियंत्रित करावे लागणार…
करोनाबाधितांची संख्या वाढत असल्याने महानगरपालिका प्रशासनाने खासगी रुग्णालयातील खाटा नियंत्रित केल्या आहेत. परंतु, आता या रुग्णालयांच्या प्रशासनालाही नियंत्रित करावे लागणार आहे. वाढीव बिलांच्या कारणातूनच खासगी रुग्णालयात उपचार घेण्यास रुग्ण नकार देत असल्याचे वास्तव आहे.
बाधितांचे नातेवाईक म्हणतात…
“करोनावर उपचार घेणे आवश्यक आहे. पण, जर तुमच्याकडे भरपूर पैसा असल्यासच खासगी रुग्णालयाची पायरी चढा,’ असा सल्ला वाढीव बिलांचा अनुभव घेतलेल्या काही रुग्णांच्या नातेवाईकांनी दिला आहे. त्यामुळे राज्य शासनाने खासगी रुग्णालयांना उपचारांचे दर ठरवून दिलेले आहेत. परंतु, हा नियम कोठेच पाळला जात नसल्याचे वास्तव आहे.
खासगी रुग्णालयांना उपचाराबाबतचे दर ठरवून दिले आहेत. वाढीव बिल आकारू नये, अशाही सूचना केलेल्या आहेत. खासगी रुग्णालयाकडून नियम मोडले जात असतील तर त्यांच्यावर नक्की कारवाई करू, याबाबत थेट संपर्क साधावा.
– नवल किशोर राम, जिल्हाधिकारी, पुणे